अन् त्यांच्या काळजाचा ठोका चुकला…!
वाकडच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये अग्निशमन विभागाची मॉक ड्रिल

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
दुपारी साडेअकरा वाजता अचानक हॉटेलच्या लॉबीत धूर पसरू लागला. अग्निबजावणीच्या सूचना सुरू झाल्या, काही क्षणातच सायरनचा आवाज कानठळ्या बसवू लागला… पाहता पाहता कर्मचाऱ्यांनी पाहुण्यांना बाहेर काढायला सुरुवात केली, आणि उपस्थितांचे काळजाचे ठोके क्षणभरासाठी थांबले. पण ही कुठलीही खरी आग नव्हती. तर ही होती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाने आयोजित केलेली मॉक ड्रिल.
रहाटणी उपअग्निशमन केंद्राच्या वतीने वाकडमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही मॉक ड्रिल पार पडली. शहरातील वाढत्या उंच इमारती व गर्दीच्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीत काय करावे, याचा सराव करून देण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला होता.
या मॉक ड्रिलमध्ये धुराने भरलेल्या भागातून सुटका, अग्निशामक सिलिंडरचा योग्य वापर, लिफ्ट न वापरता जिन्यांचा वापर, तसेच आपत्तीच्या क्षणी शांत राहून तात्काळ निर्णय घेण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. हॉटेलमधील कर्मचारी, व्यवस्थापन आणि पाहुण्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेतला.
हेही वाचा : मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आल्याची घटना
सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सरावात प्रभारी उपअग्निशमन अधिकारी विजय घुगे, उपअग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांच्यासह अग्निशमन दलाचे अधिकारी, जवान आणि शिकाऊ कर्मचारी सहभागी झाले होते.
उमेश ढाकणे यांनी सांगितले की, “अग्निदुर्घटना कधीही, कुठेही होऊ शकते. अशा वेळी वेळ वाचवून घेतलेली कृतीच जीव वाचवते. मॉक ड्रिलद्वारे आम्ही केवळ सराव घडवत नाही, तर मानसिक तयारीही करून देतो.”
प्रभारी अधिकारी विजय घुगे म्हणाले, “या सरावामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. आपत्ती व्यवस्थापनात त्वरित निर्णय घेणे व घाबरून न जाता कृती करणे, हेच यशस्वी टप्पे आहेत.”