पिंपळे निलख येथील दुकानांना भीषण आग; नगरसेवक तुषार कामठे मदतीला धावले!
![Fierce fire at shops in Pimple Nilakh; Corporator Tushar Kamthe rushed to help!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/c5648ae2-8093-45ec-8338-da4c6d12485f.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपळे निलख येथील चार दुकानांना शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली. सुदैदवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, यामध्ये लाखों रुपयांचे साहित्य खाक झाले आहे.दरम्यान, भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन विभागाशी संपर्क साधला आणि घटनास्थळी मदतकार्य सुरू केले.
या आगीमध्ये आदिती सुपर मार्केटमधील इलेक्ट्रिक वस्तू दुकानाचे फर्निचर खाक झाले आहे. सुपर सोफा दुकानातील गादी बनवण्याचे साहित्य, फॅब्रिक, कापूस, कॉटन मटेरियल, मशिन जळून खाक झाले आहे. साई फॅब्रिकेशन दुकानाच्या एका बाजूचा पत्रा गरम झाल्यामुळे वायरिंगची एक मशिन आगीच्या उष्णतेने जळून गेली. अमिर चिकन सेंटर याही दुकानाच्या एक्साईडचा पत्रा उष्णतेने गरम होऊन फर्निचर वायरिंग आगीमध्ये नुकसानग्रस्त झाली आहे. सदर चारही दुकान जागा नितीन नांदगुडे यांची असून चारही पत्राशेडमध्ये उभारलेली दुकाने भाडेतत्वावर असल्याचे दुकान चालकांनी सांगितले आहे. जळालेल्या दुकानांपैकी सुपर सोफा या दुकानात आग लागून ही आग अन्य दुकानांमध्ये पसरली, असे स्थानिकांनी सांगितले आहे. आग लागण्याचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. आगीच्या घटनामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.
केंद्राचे उपअग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे, दिलीप गायकवाड, कैलास वाघेरे, विशाल बाणेकर, रुपेश जाधव, बाळासाहेब वैद्य, भूषण येलवे, तानाजी चिंचवडे, कृष्णा राजकर, दिग्विजय नलावडे, स्नेहल रायसिंग यांसह २७ कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.
अग्निशमन विभागाची दक्षता अन् नागरिकांची सतर्कता…
नवीन डीपी रस्ता येथील दुकानांना आग लागल्याची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिका मुख्य अग्निशमन केंद्राचे दोन, रहाटणी उपअग्निशमन केंद्राचे एक, भोसरी उप अग्निशमन केंद्राची एक गाडीघटनास्थळी दाखल झाली. सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. स्थानिक नागरिकांनीही प्रसंगावधान राखत मदत केली. अग्निशमन विभागाने घेतलेली दक्षता आणि स्थानिक नागरिकांनी दाखवलेली सतर्कता यामुळे आणखी मोठी दुर्घटना टळली, अशी माहिती भाजपा नगरसेवक तुषार कामठे यांनी दिली.