महापालिकेत कोरोना पॉझिटिव्ह ठेकेदार फिरल्याने खळबळ
![Excitement over Corona Positive Contractor's move in the municipality](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/pcmc-1-5.jpg)
- आयुक्त राजेश पाटील यांचा आदेश धाब्यावर, गुन्हा दाखल होणार
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. अशा परिस्थितीत महापालिकेतील एक कोरोना पॉझिटिव्ह ठेकेदार शुक्रवारी दिवसभर महापालिका आवारात फिरल्याने खळबळ उडाली आहे. होम आयोसेलेट रुग्ण फिरल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी गुरुवारी (दि.११) दिला. आज दुसऱ्याच दिवशी पालिकेच्या ठेकेदारानेच आयुक्तांचा आदेश धाब्यावर बसवला. दरम्यान, संबंधीत ठेकेदारावर कारवाई होणार असल्याचे महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी सांगितले.
महापालिकेच्या फोटोग्राफी आणि संबंधीत कामाचा ठेका असलेला एक ठेकेदार कोरोना पॉझिटिव्ह होता. गेले आठवडाभर तो रुग्णालयात दाखल होता. दोनच दिवसांपूर्वी त्याला डिस्चार्ज मिळाला आणि लगेचच तो महापालिका भवनात आला. जनसंपर्क कार्यालयाच्या आवारात तो फिरत होता. त्यानंतर तिसरा-चौथा मजला असा फिरत होता, असे प्रत्यक्षदर्शीने सांगतिले. कोरोनाचा रुग्ण महापालिकेत फिरतो म्हटल्यावर खळबळ उडाली. सर्व पत्रकारांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांच्यावर आहे. कोरोना पॉझिटिव्ह ठेकेदार बिल मंजूर करून घेण्यासाठी आला असल्याची माहिती एका पत्रकाराने प्रशासनात दिली.
दरम्यान, किरण गायकवाड यांना यासंदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले, होय असे एक ठेकेदार आले होते. ते कोरना बाधीत होते अशी माहिती आता पुढे आली. त्यांची माहिती घेण्याचे काम सुरू असून संबंधीत प्रभाग अधिकाऱ्यांना पुढील कारवाईसाठी कळविण्यात आले आहे. पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीने नियमांचं पालन केले पाहिजे. त्यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत.
आयुक्त राजेश पाटील यांनी कोरोना रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कुठेही कोरोनाचा रुग्ण असेल अथवा होम आयोसेशन रुग्ण बाहेर फिरत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करणार असे सांगितले. आता महापालिकेचाच ठेकेदार सापडल्याने त्याच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.