शहरातील 2800 नागरिकांचे स्थलांतरण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/www.mahaenews.com-62-2-780x470.jpg)
पिंपरी : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून त्या त्या भागातील पूर नियंत्रण परिस्थिती हाताळली जात आहे. आतापर्यंत शहरातील सुमारे 2800 पेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी निवारा केंद्रांमध्ये तसेच महापालिका शाळांमध्ये हलविण्यात आले आहे. याठिकाणी भोजनासह आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून शहरात विविध ठिकाणी बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.
अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सम्राट चौक, लालटोपी नगर, भाटनगर, पिंपरी रिव्हर रोड, रामनगर, पत्राशेड लिंकरोड, बौद्धनगर आदी ठिकाणी बचावकार्य करण्यात आले असून सुमारे 650 नागरिकांना भाटनगर पिंपरी शाळा, आंबेडकर कॉलनी, मेवणी हॉल, निराधार हॉल पिंपरी येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.
‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील चिंचवड येथील तानाजी नगर , काळेवाडी येथील पवनानगर, रावेत येथील समीर लॉन्स, शिंदे वस्ती रस्ता, जाधव घाट आदी परिसरात बचावकार्य करण्यात आले असून सुमारे 300 नागरिकांना काळेवाडी येथील महापालिकेच्या प्राथमिक शाळेत तसेच दत्तोबा काळे इंग्रजी मिडीयम स्कूलमध्ये स्थलांतरीत केले.
हेही वाचा – Positive Initiatives | नैसर्गिक आपत्तीच्या काळात आमदार महेश लांडगे यांची सतर्कता!
ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत लक्ष्मीनगर गल्ली क्र. 3,4,5,6, पवार वस्ती, पिंपळेगुरव, भुजबळ वस्ती, वाकड आदी परिसरात बचावकार्य करण्यात आले असून 31 नागरिकांना पिंपळेगुरव येथील नवीन मुला मुलींच्या शाळा नं. 54 येथे तर 10 नागरिकांना वाकड येथील आबाजी भूमकर शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे.
‘ई’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत रामनगर, बोपखेल येथे 20 ते 25 घरांमध्ये तीन ते चार फुट पाणी शिरले होते. याठिकाणी बचावकार्य करण्यात आले असून सुमारे 100 नागरिकांचे मनपाच्या बोपखेल येथील प्राथमिक शाळेत स्थलांतरण करण्यात आले आहे.
‘फ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत घरकुल, श्रीराम कॉलनी, तळवडे, डिफेंस कॉलनी, पाटीलनगर, चिखली आदी परिसरात बचावकार्य करण्यात आले. या ठिकाणांहून साचलेले पाणी तसेच घरांमध्ये शिरलेले पाणी काढण्यात आले आहे. तसेच नदीकाठच्या नागरिकांना सूचना देऊन स्थलांतरीत करण्याची कार्यवाही सुरू आहे.
‘ग’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत संजय गांधी नगर, आंबेडकर नगर, सुभाष नगर, पवना नगर, जगताप नगर, संजय गांधी नगर या ठिकाणी बचावकार्य करण्यात आले असून सुमारे 330 नागरिकांना कमला नेहरू शाळा, पिंपरी येथे, 450 नागरिकांना रहाटणी शाळा येथे, 40 नागरिकांना थेरगाव शाळा येथे तर 50 नागरिकांना विवेकानंद बॉक्सिंग हॉल येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.
‘ह’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत हिराबाई झोपडपट्टी, कासारवाडी, भारत नगर, फुगेवाडी, दापोडी परिसर मुळानगर, मधुबन सोसायटी, जुनी सांगवी आदी ठिकाणी बचावकार्य करण्यात आले असून 150 नागरिकांचे कासारवाडी उर्दू शाळेत, सुमारे 300 नागरिकांचे मीनाताई ठाकरे महापालिका शाळेत, सुमारे 150 नागरिकांचे दापोडी येथील हुतात्मा भगतसिंग महापालिका शाळेत स्थलांतर तर सुमारे 300 नागरिकांचे जुनी सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. अद्याप शहरातील विविध ठिकाणी नियंत्रण पथके तैनात असून बचावकार्य सुरू आहे.