इंद्रायणीनगरमधून आठशे महिलांना अक्कलकोट दर्शन!
आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम : माजी नगरसेविका नम्रता लोंढे, योगेश लोंढे यांचा पुढाकार
![Eight hundred women from Indrayaninagar have Akkalkot Darshan!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Namrata-Londe-780x470.jpg)
पिंपरी: त्रिपुरारी पोर्णिमेच्या शुभ मुहुर्तावर इंद्रायणीनगर, भोसरी येथील नागरिकांना अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन मिळाले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी नगरसेविका नम्रता लोंढे, सामाजिक कार्यकर्ते योगेश लोंढे यांच्या पुढाकाराने आठशे महिलांना घेऊन ही दर्शन यात्रा काढण्यात आली. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी समर्थांचे दर्शन भेटल्याने प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
बुधवारी (दि. 29) सकाळी आमदार महेश लांडगे यांचे बंधू कार्तिक लांडगे यांच्या हस्ते बसची पूजा करून बस मार्गस्थ करण्यात आली. या वेळी माजी नगरसेविका नम्रता लोंढे, योगेश लोंढे आदींसह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरी विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडात्मकसह नागरिकांच्या उपयोगी कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. क्रिकेट स्पर्धा, महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम, पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी रिव्हर सायक्लोथॉन यासह बैलगाडा शर्यत आदींसह विविध कार्यक्रम सध्या मतदारसंघाबरोबरच ग्रामीण भागात देखील आयोजित केले जात आहेत. याचे निमित्त साधत लोंढे दाम्प्त्यांनी श्री स्वामी समर्थ दर्शनाचे आयोजन केले होते.
आपल्या मार्गदर्शक नेत्यांचा वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता नागरिकांना समाधान मिळेल, असा उपक्रम आयोजित करण्याच्या उद्देशाने माजी नगरसेविका नम्रता लोंढे आणि सामाजिक कार्यकर्ते योगेश लोंढे यांनी दर्शन यात्रेचे आयोजन केले. प्रभागातील सुमारे आठशे महिलांना अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घडविले. त्यामध्ये महिलांनी देखील उत्स्फूर्त असा सहभाग घेतला. अक्कलकोट येथील अन्नछत्र येथे सर्व महिलांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. अन्नछत्रचे विश्वस्त अध्यक्ष अमोलराजे जन्मेयराजे भोसले यांनी स्वागत करून सन्मान केला. तसेच अक्कलकोट शहराचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी या वेळी उपस्थित होते. या दर्शन यात्रेनंतर समाधानाची भावना महिलांनी व्यक्त केली.
आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शन यात्रेचे आयोजन केले होते. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी स्वामींचे दर्शन प्रत्येक महिलेला घडविले हे आम्ही आमचे भाग्य समजतो. अनावश्यक खर्च टाळून महिलांना अपेक्षित असणारे कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. त्या उद्देशानेच या यात्रेचे आयोजन केले.
– नम्रता लोंढे, माजी नगरसेविका.
अध्यात्मिक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मोफत दर्शन यात्रा घडवल्याचे पुण्य नम्रता लोंढे यांना मिळाले आहे. अशा प्रकारचे उपक्रम निश्चितपणे समाजासाठी आदर्शवत आहेत.
– मनिषा गुरव, यात्रेकरू.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून वाढदिवस आणि उत्सव, समारंभावर अनावश्यक खर्च केला जातो. मात्र, नम्रता लोंढे मीआणि योगेश लोंढे यांनी विधायक उपक्रम आयोजित केला. सर्व महिलांची व्यवस्था अत्यंत सुरेख केली. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचे दर्शन झाल्याने खूप आनंद झाला.
– ज्योती सर्जीने, यात्रेकरू.