पिंपरी-चिंचवडमध्ये पाणी प्रश्न सुटेपर्यंत ‘बांधकाम बंदी’ ची मागणी
आम आदमी पार्टीचे महापालिकेला निवेदन : पाणी समस्यांमुळे पिंपरी-चिंचवडकरांत तीव्र संताप

पिंपरी-चिंचवड | महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये अद्यापही नागरिकांना ‘दिवसाआड पाणी’ या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. शहरातील कमी दाबाचा आणि अनियमित पाणीपुरवठा यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या वतीने आम आदमी पार्टीने आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे ठोस पावले उचलण्याची मागणी केली आहे.
‘आप’ शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त मनोज लोणकर यांना निवेदन देऊन, “शहरात पाणी प्रश्न सुटेपर्यंत सर्व नवीन बांधकामांना परवानगी देणे थांबवावे आणि सध्या सुरू असलेल्या बांधकामांनाही तातडीने ‘स्टॉप वर्क’ नोटीस बजावावी,” अशी मागणी केली आहे.
रविराज काळे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, “एका बाजूला नागरिकांना पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी आणि दैनंदिन वापरासाठी पुरेसे पाणी मिळत नाही, तर दुसऱ्या बाजूला महापालिका प्रशासन अंधाधुंदपणे नवीन बांधकामांना परवाने देत आहे. हे धोरण नागरिकांच्या हिताविरुद्ध असून, आधीच ताणलेल्या पाणीपुरवठा यंत्रणेला अधिक भार देणारे आहे.”
हेही वाचा : “दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही”; अभिनेत्री ममता कुलकर्णीचा धक्कादायक दावा
‘आप’ची प्रमुख मागणी:
- पाणीपुरवठा पूर्ण क्षमतेने आणि दिवसातून दोन वेळा सुरू होईपर्यंत सर्व नवीन बांधकामांना परवाने देऊ नयेत.
- सध्या सुरू असलेल्या बांधकामांवर ‘स्टॉप वर्क’ नोटीस बजावावी.
- पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र धरण उभारण्याच्या प्रस्तावावर तातडीने विचार व्हावा.

निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, जर प्रशासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही केली नाही, तर आम आदमी पार्टीकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल.
या प्रसंगी शहराध्यक्ष रविराज काळे यांच्यासोबत नवनाथ मस्के, शुभम यादव, विकी पासोटे, राहुल मदने, अॅड. सुप्रिया गायकवाड, शिवकुमार बनसोडे, यल्लापा वालदोर, लक्ष्मण माने आणि अभिजित कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवडमधील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर ‘आप’ची ही मागणी नागरिकांच्या भावना प्रतिबिंबित करणारी ठरत असून, आता महापालिका प्रशासन या गंभीर प्रश्नावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




