breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘अमृत’ योजनेतील निविदेसाठी ‘तारीख पे तारीख’; प्रशासनाची भूमिका संशयास्पद!

राज्य सरकारच्या आदेशाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

शहरातील १३ एसटीपी उभारलेल्या ठेकेदारासाठी पायघड्या?

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
‘अमृत’ फेज- २ अभियानांतर्गत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) एक वर्षाच्या कालावधीत पूर्ण करणे बंधनकारक असताना महापालिका प्रशासनाने राज्य शासनाच्या आदेशाला हरताळ फासला आहे. या योजनेतील प्रकल्पांसाठी राबवलेल्या निविदा प्रक्रियेत ‘तारीख पे तारीख’ देत प्रशासन वेळकाढूपणा करीत आहे. विशिष्ठ ठेकेदाराला डोळ्यांसमोर ठेवून प्रशासन संशयास्पदपणे ही निविदा राबवत आहे. त्यामुळे अमृत योजनेचा प्रशासन बट्टयाबोळ करणार आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
केंद्र शासन पुरस्कृत ‘अमृत’ फेज- २ अभियानांतर्गत मंजूर केलेल्या पिंपरी-चिंचवड मलनिस्सारण प्रकल्पातील वाढीव व अतिरिक्त कामांना मान्यता देण्याचा निर्णय राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीत घेतला होता. ‘अमृत’ अभियानाचा निधी संपुष्टात आल्यामुळे आणि अभियानाची मुदतही संपत असल्यामुळे या प्रकल्पांसाठी वाढीव निधी देता येणार नाही, असे महापालिकेला राज्य शासनाने कळवले आहे. तसेच, एक वर्षाच्या कालावधीत प्रकल्पांची अपेक्षित फलनिष्पत्ती केली पाहिजे, असे स्पष्ट आदेश दि. २८ एप्रिल २०२१ रोजी राज्याच्या नगर विकास विभागाने महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
महापालिका प्रशासनाने अमृत योजना फेज- २ अंतर्गत निविदा दि. १८ जून २०२१ रोजी प्रसिद्ध केली. या निविदा स्पर्धेसाठी निविदापूर्व बैठक दि. २८ जून २०२१ रोजी झाली. त्यामध्ये ११ विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. मात्र, शहरातील एका राजकीय नेत्याच्या संबंधित कंपनीला काम देण्यासाठी नियम व अटी बदलण्याचा घाट घातला आहे. परिणामी, अद्यापही निविदापूर्व बैठकीत झालेल्या चर्चेनुसार जे मुद्दे मांडण्यात आले त्याबाबत प्रशासनाने कार्यवाही केलेली नाही. यापूर्वीच या कामाच्या निविदेला १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. प्रशासन कोणत्या नियम आणि अटींमध्ये बदल करणार याबाबत स्पष्टता नाही.
वास्तविक, शहरात एकाच ठकेदाराने यापूर्वी १३ ठिकाणी एसटीपी प्लँट उभारले आहेत. त्याच ठेकेदाराला संबंधित काम मिळावे, यासाठी महापालिका अधिकारी प्रयत्न करीत आहेत, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
आमदार अण्णा बनसोडेंच्या पत्राला ‘केराची टोपली’
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, तर महापालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. राजकीय अस्थिरतेचा फायदा प्रशासन आणि अधिकारी घेत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी या कामाची निविदा प्रक्रिया पारदर्शीपणे राबवावी, अशी मागणी केली होती. याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना संपर्कही केला होता. मात्र, अद्याप प्रशासनाकडून कसलीही हालचाल झालेली नाही.
महापालिका अधिकारी काय म्हणतात…
महापालिका जलनिस्सारण विभागाचे सह शहर अभियंता रामदास तांबे म्हणाले की, अमृत योजना फेज- २ च्या कामाला होणारी दिरंगाई आणि निविदा प्रक्रिया नियमानुसार सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी निविदा प्रक्रियेवर संयश व्यक्त केल्याबाबत पत्र अद्याप आमच्या विभागाकडे आलेले नाही. निविदा कार्यवाही सुरू आहे. निविदा पूर्व बैठकीनंतर कॉमन सेट ऑफ डेव्हीएशन (सीएसडी) प्रसिद्ध करावा लागतो. त्याचे सादरीकरण आयुक्तांकडे करावे लागते. त्यासाठी निविदेला मुदतवाढ दिली आहे. निविदा पूर्व बैठकीनंतर मुदतवाढ द्यावीच लागले. सध्या ३० तारखेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ऑगस्ट महिन्याचा पहिल्या आठवड्यापर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होईल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button