#COVID19 : अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना सहकार्य करा : आमदार महेश लांडगे
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
देशात आणि राज्यात कोरोनामुळे थैमान घातले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत नागरिकांनी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या ‘रिअल हिरोंना सहकार्य करावे, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.
आमदार लांडगे यांनी म्हटले आहे की, पोलीस यंत्रणा, डॉक्टर्स, अत्यावश्यक सेवा पुरविणारे, महापालिका आरोग्य अधिकारी, कर्मचारी या सर्वांना नागरिकांनी सहकार्य करावे. संबंधित कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून आपल्यासाठीच अहोरात्र झटत आहेत. पोलिसांनी लोकांना मारण्याचे विडिओ तुम्ही पहात असाल पण असे करण्यात त्यांना काही आनंद होत नाही. काहीलोक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. परिणामी, पोलीस प्रशासनाला कठोर भूमिका घ्यावी लागत आहे. मी व माझे सर्व राजकीय सहकारी आज बाहेर येऊन आपली मदत करू शकत नाही कारण आम्हाला शासन त्याची परवानगी देत नाही. पण, आम्ही सर्व प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहोत, असेही लांडगे यांनी म्हटले आहे.
****
महापालिका आयुक्तांचे सतर्कता उल्लेखनीय…
महाराष्ट्रात कोरोना संसर्गयुक्त लोकांची संख्या पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वात जास्त होती. महापालिका आयुक्त श्रावण हार्डिकर यांनी अचूक नियोजन करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. पण गेल्या पाच दिवसांत शहरात एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. महापालिका आयुक्त आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांना कोणताही नाहक त्रास होणार नाही, याची काळजी घेतली आहे, असेही आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे.