COVID 19 : मनसे गटनेते सचिन चिखले यांनी आयुक्तांना सुनावले खडेबोल, म्हणाले खळ्ळखट्ट्याकची वाट पाहू नका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/IMG-20200805-WA0099-1.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोविड 19 च्या विषाणुने पिंपरी-चिंचवडला अक्षरषः विळखा घातला आहे. असे असताना आयुक्त श्रावण हर्डीकर मात्र शांत भूमिकेत आहेत. रुग्णसंख्या वाढत असताना रुग्णालयात वैद्यकीय उपकरणांची कमतरता भासते आहे. नवीन रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्यामुळे जीवाला धोका होण्याची भीती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे शहराध्यक्ष तथा पालिकेतील गटनेते सचिन चिखले यांनी यापूर्वी केलेल्या मागणीची आठवण करून देण्यासाठी काल आयुक्त हर्डीकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी शेलक्या शब्दांत चर्चा केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन बेड्स, साधे बेड्स आणि व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध नाहीत. परिणामी, रुग्णांचे हाल होत आहेत. प्रत्येक कोविड 19 बाधित रुग्णांवर योग्य उपचार झाले पाहिजेत. त्यासाठी ज्या रुग्णालयांमध्ये उपकरणांची गरज भासत आहे. त्याठिकाणी ती उपकरणे तातडीने उपलब्ध करावीत. दिवसाला 800 ते 1000 रुग्णसंख्या नोंदीत आहे. एवढे रुग्ण वाढत असताना उपकरणे उपलब्ध न करण्याचे कारण काय ?, असा सवाल चिखले यांनी उपस्थित केला. पालिका प्रशासनाने नागरिकांच्या संयमाची वाट पाहू नये. नागरिकांचा उद्रेक झाला तर त्याला पालिका प्रशासनच जबाबदार असेल, असा इशारा देखील चिखले यांनी आयुक्तांना दिला. त्यानंतर आयुक्तांनी यावर तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/IMG-20200805-WA0101-1024x491.jpg)
त्यानंतर चिखले यांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांची भेट घेतली. त्यांनाही खडेबोल सुनावले. त्यावर पुढील दहा दिवसांमध्ये 80 ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यात येतील. अॅटो क्लस्टर याठिकाणी 60 व्हेंटिलेटर, वायसीएम रुग्णालयात 30 आणि भोसरी बाल नगरी (गवळी माथा) येथे 425 खाटा उपलब्ध होतील. त्यामध्ये 300 प्राणवायू, 125 साध्या खांटाचा समावेश आहे. अॅटो क्लस्टर याठिकाणी 150 साध्या आणि 60 अतिदक्षता अशा 210 खाटा तसेच आण्णासाहेब मगर मैदान येथे मोठे कोरोना काळजी केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आपली मागणी मान्य करून मोठ्या प्रमाणात खाटा उपलब्ध केल्या जाणार आहेत, असे आश्वासन डॉ. रॉय यांनी दिले.
आयुक्तांना पूर्वीच्या मागणीचे झाले स्मरण
मनसेला दिलेल्या आश्वासनांची गांभिर्याने दखल घ्यावी. दिलेल्या वेळेत दिलेला शब्द पाळून बेड्स उपलब्ध करावेत. रुग्णांचे होणारे हाल थांबले नाहीत, तर मनसेला भूमिका बदलावी लागेल. कारण, यापूर्वी देखील आयुक्तांना बेड्स वाढविण्यासंदर्भात निवेदन दिले होते. त्यावर कोणत्याही प्रकारची गांभीर्यपूर्वक भूमिका घेतली गेली नाही. आता यावेळी दिलेले आश्वासन वेळेत पूर्ण नाही केल्यास मनसेचा खळ्ळखट्ट्याक काय आहे, तो दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सचिन चिखले यांनी आयुक्त आणि डॉ. रॉय यांना दिला. त्यांच्यासोबत बाळा दानवले, राजू सावळे, दत्ता देवतरासे आदी उपस्थित होते.