COVID 19 : पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज – देवेंद्र फडणवीस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/IMG-20200623-WA0034.jpg)
पिंपरी | महाईन्यूज| प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असून शहरातील नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे कोरोना बाधितांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना व सुविधांचा आढावा घेण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, माजी खासदार अमर साबळे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसदस्य बाबू नायर, नगरसदस्या सुजाता पालांडे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, उपअधिक्षक डॉ. शंकर जाधव, डॉ. अभय दादेवार, डॉ. यशवंत इंगळे, डॉ. अनिकेत लाठी, डॉ. किशोर खिलारे, डॉ. विनायक पाटील, डॉ. प्रवीण सोनी, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, महापालिकेने कोरोना आटोक्यामध्ये आणण्यासाठी विविध प्रयत्न केले आहेत. महापालिकेतर्फे वॉररूम तयार करण्यात आली असून त्याद्वारे शहरातील रुग्णसंख्या व प्रतिबंधीत क्षेत्र याची माहिती सर्वांना त्वरित मिळू शकते. पावसाळ्यामध्ये रुग्ण वाढीची शक्यता लक्षात घेवून त्या दृष्टीने महापालिकेने विशेष नियोजन केलेले आहे असे सांगून त्यांनी महानगरपालिकेतर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिका करीत असलेल्या कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती दिली. कोरोना बाधितांचे स्वॅब नमुने तपासणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून अहवालाचा विलंब टाळण्यासाठी महानगरपालिका स्वतःची प्रयोगशाळा लवकरच सुरु करीत आहे असेही आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले. अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.