#Coronafight : गोपाळ माळेकर, बाळासाहेब काळे यांच्या वतीने ४५० गरजूंना अन्नधान्य वाटप, आमदार जगतापांनी केले कौतुक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/IMG-20200408-WA0017.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोरोनामुळे मागील पंधरा दिवसांपासून देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील हजारो कुटुंबियांची आर्थिक अडचण झाली आहे. अशा गरीब कुटुंबांना, शहरात भाड्याने राहणा-या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अन्नाची टंचाई भासत आहे. या गरजू, गरीब, कुटुंबांना व विद्यार्थ्यांना सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मदत करण्याच्या उद्देशाने स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर आणि बाळासाहेब काळे यांच्या संकल्पनेतून सात शासकीय अधिकाऱ्यांसह त्यांच्या एकूण १४ मित्रांनी एकत्र येत सुमारे ४५० गरजवंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.
स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर आणि बाळासाहेब काळे यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमात त्यांच्या १४ मित्रांनी एकत्र येऊन प्रत्येकाने आपापल्या परीने आर्थिक मदत जमा केली. यातून जमलेल्या रकमेतून त्यांनी परिसरातील सुमारे ४५० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे सोमवारी व मंगळवारी मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमात माळेकर व काळे यांच्यासह संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष नरेंद्र माने, उद्योजक विजय कांबळे, सचिन चव्हाण, प्रशांत गट्टेवार, भाजपाचे प्रभाग अध्यक्ष माधव मनोरे, दिनेश पवार, महादेव शेळके, भुजंगराव खेनट, उद्योजक शंकर थोरात यांच्यासह सात शासकीय अधिकारी मित्रांनी मोलाची मदत केली. दरम्यान, रहाटणी परिसरात राहणान्या ४५० कष्टकरी गरजूंना वाटप करण्यात आले. त्याचबरोबर कोरोना विषाणूसंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना गोपाळ माळेकर म्हणाले, की, कोणीही व्यक्ती उपाशी पोटी राहू नये, असे तत्व असणाऱ्या कार्यसम्राट आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही संकल्पना राबविण्याचा प्रयत्न केला. या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणा-या गरीब कुटुंबातील कष्टकऱ्यांचे खूप हाल होत आहेत. मुलाबाळांवरही उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, देशाच्या हितासाठी लॉकडाऊन गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर एक सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून आम्ही मित्रांनी या कष्टकऱ्यांच्या किमान महिनाभराच्या अन्नधान्याचा प्रश्न मार्गी लावण्याची तजबीज केली आहे.