गड-किल्ल्यांचे संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी : कविता भोंगाळे
- भोसरी येथे शिवस्वराज्य किल्ले बनवा स्पर्धा उत्साहात
- परिसरातील शिवभक्त अन् बालचमुंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी या मातीत जन्म घेऊन साडेतीनशे वर्ष झाले. मात्र, त्यांचा विचार, स्मृती गड-किल्ल्यांच्या रूपाने आपणा सर्वांना सदैव प्रेरणा देत आहेत. त्या गडकिल्ल्यांचे रक्षण, संवर्धन करणे प्रत्येकाची जबाबदारी असून, ‘किल्ला बनवा’ स्पर्धेतून त्याच परंपरेला आम्ही कृतीची जोड देण्याचा प्रयत्न करीत आहोत. शिव विचार नव्या पिढीत रुजवण्याचा आमचा संकल्प आहे, अशा भावना भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस कविता भोंगाळे यांनी व्यक्त केल्या.
भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी येथे भाजपा महिला मोर्चा व कविता भोंगाळे युवा मंचच्या संयुक्त विद्यमाने दीपावलीच्या निमित्याने शिवस्वराज्य किल्ला बनवणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी कविता भोंगाळे बोलत होत्या. मंचच्या वतीने किल्ला बनवणे स्पर्धेच्या आयोजनाचे हे दुसरे वर्ष होते या स्पर्धेला भोसरी परिसरातील शिवभक्त तसेच बालचमुकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी कल्पना धाडसे, मनीषा गंगणे, सुमन उंडे, आशा घुगे, वैशाली कापसे, चरणदास वानखेडे, वेदंता शिंदे, सुरेखा सवाई, जयंत अंबेकर, संतोष जठार, दत्ता मोहिते, प्रभाकर चव्हाण, विनोद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवराज आंबेकर याला प्रथम पारितोषिक…
स्पर्धेत शिवराज आंबेकर याने साकारलेल्या प्रतापगडाच्या प्रतिकृतीला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवराज आंबेकर, द्वितीय क्रमांक सार्थक बेहरा, तृतीय क्रमांक अनिकेत जोहरकर, चतुर्थ क्रमांक प्रेम कापसे, हर्ष कोडगीरे, यांनी स्पर्धेत बाजी मारली. विजेत्याना तसेच सहभागी स्पर्धकांना छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक पूर्णाकृती प्रतिकृती तसेच सन्मानपत्र देत सन्मानित भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस कविता भोंगाळे यांच्या हस्ते करण्यात आले.