मोशी परिसरात दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
चार दिवसांत प्रश्न सुटला नाही तर फेडरेशनकडून तीव्र आंदोलनाचा इशारा

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील मोशी प्राधिकरण परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून अत्यंत दूषित पाणीपुरवठा होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्राधिकरणातील सेक्टर ४ ते १३, शिवाजीवाडी मोशी तसेच बोऱ्हाडेवाडी परिसरात महानगरपालिकेकडून पुरवण्यात येणाऱ्या पाण्याला तीव्र दुर्गंधी येत असून पाण्याचा रंगही पिवळसर असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
या दूषित पाणीपुरवठ्यामुळे लहान मुले, वयोवृद्ध नागरिक, महिला तसेच इतर नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. हा प्रश्न थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे.
हेही वाचा : आवाज कुणाचा? माटे शाळेचा! ‘सकाळ NIE’ आंतरशालेय नाट्य स्पर्धेत ‘निर्धार’ची बाजी
या संदर्भात चिखली–पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी महापालिका आयुक्त माननीय श्री. श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदन देऊन तातडीने शुद्ध पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
फेडरेशनकडून वारंवार पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही कोणतीही ठोस सुधारणा झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवसांत पाणीपुरवठा व्यवस्थित झाला नाही तर फेडरेशनच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान हेच दूषित पाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पाजण्यात येईल, असा तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. या विषयाची माहिती आमदार महेश लांडगे, तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही देण्यात आली असून नागरिकांकडून प्रशासनाकडून तातडीच्या कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मागील पंधरा दिवसापासून प्राधिकरणातील सेक्टर 4 ते 13 त्याचप्रमाणे शिवाजीवाडी मोशी, बोऱ्हाडेवाडी या ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत वारंवार अधिकाऱ्यांशी संपर्क साधून देखील यामध्ये काहीही फरक पडलेला नाही. पुढील चार-पाच दिवसात हा पाणीपुरवठा शुद्ध आणि सुरळीत झाला नाही, तर फेडरेशनमार्फत आंदोलन करण्यात येईल आणि हेच पाणी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तिथे जाऊन पाजण्यात येईल.
– संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली – पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.




