Pimpri| प्रसूती झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याचा नातेवाईकांचा आरोप

पिंपरी | प्रसूती झाल्यानंतर रक्तस्राव थांबत नसल्याने यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचार सुरू असतानाच वायसीएममध्ये हलविल्याने आणि त्यात ४० मिनिटांचा वेळ गेल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.
पिंपरीतील कैलाशनगर येथील श्वेता अश्विन यादव ही ३० वर्षांची गरोदर महिला २० मे रोजी नियमित तपासणीसाठी जिजामाता रुग्णालयात गेली होती. त्यांना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले. २१ मे रोजी दुपारी त्या रुग्णालयात दाखल झाल्या. २२ मे रोजी त्यांना सकाळी साडेआठ वाजता प्रसूतीसाठी दाखल केले. त्यांचे सिझेरिअन करण्यात आले. बाळाला नवजात अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) ठेवण्यात आले.
हेही वाचा – चीनने भारतीय सीमेजवळ तैनात केली लढाऊ विमाने, सॅटेलाईट फोटोमध्ये धक्कादायक खुलासा
श्वेता यांना रक्तस्राव होऊ लागला. त्यामुळे पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी वायसीएमला नेण्यास सांगितले. वायसीएममध्ये घेऊन जाण्यास ३५ ते ४० मिनिटांचा कालावधी गेला. तिथे उपचार झाले. परंतु, दुसऱ्याच दिवशी २३ मे रोजी सकाळी नऊच्या सुमारास उपचारादरम्यान श्वेता यांचा मृत्यू झाला.




