छत्रपती संभाजी महाराज शिल्प शहरवासीयांसाठी प्रेरणादायक ठरेल – महापौर ढोरे
![Chhatrapati Sambhaji Maharaj Shilpa will be an inspiration for the city dwellers - Mayor Dhore](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/Dhore-1.jpg)
पिंपरी चिंचवड | छत्रपती संभाजी महाराज शिल्प शहरातील सर्वांसाठी प्रेरणादायक ठरेल असे, मत महापौर उषा ढोरे यांनी व्यक्त केले.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 2 मधील विनायकनगर, बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प उभारण्यात येत आहे. या कामाची पाहणी महापौर ढोरे यांनी आज (शुक्रवारी) केली. उपमहापौर हिराबाई घुले, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, नगरसदस्या सारिका सस्ते, अश्विनी जाधव, कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे, उप अभियंता जयवंत जाधव, कनिष्ठ अभियंता हेमंत घोड उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प संपूर्ण ब्राँझचे असून प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार हे शिल्प तयार करीत आहेत. या शिल्पाची उंची 100 फूट असून 40 फूट उंच चौथऱ्यावर तो बसविण्यात येत आहे. हे शिल्प पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात भर पाडेल. हा प्रकल्प सुमारे 6.5 एकर क्षेत्रावर विकसित करण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे 45 कोटी खर्च अपेक्षित आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा, सूचना महापौर ढोरे यांनी दिल्या.