दर्शन कॉलनी-बंसल विहारमध्ये चेंबर लाईन कामाचा शुभारंभ
भाजपा नगरसेविका कविता भोंगाळे यांचा पुढाकार

परिसरातील नागरिक, सोसायटीधारकांना दिलासा
पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक ५ मधील दर्शन कॉलनी व बंसल विहार परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या ड्रेनेज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नवीन चेंबर लाईनच्या कामाचा शुभारंभ नगरसेविका कविता भोंगाळे यांच्या पुढाकाराने करण्यात आला. या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दर्शन कॉलनी व बंसल विहारमधील नागरिकांना ड्रेनेजच्या समस्येमुळे वारंवार अडचणींचा सामना करावा लागत होता. साचलेले पाणी, अस्वच्छता आणि दुर्गंधी यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत होत्या. ही बाब गांभीर्याने लक्षात घेऊन कविता भोंगाळे यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करत चेंबर लाईनचे काम मार्गी लावले.
हेही वाचा : युट्युबर कॅरीमिनाटीला न्यायालयाचा दणका, व्हिडिओ हटवण्याचे आदेश
यावेळी बोलताना कविता भोंगाळे यांनी सांगितले की, परिसरातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळणे आवश्यक आहे. ड्रेनेजसारख्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होता कामा नये. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन हे काम हाती घेण्यात आले असून ते दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, वीज आणि इतर मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शुभारंभ प्रसंगी नगरसेवक सागरभैय्या गवळी, जालिंदर बापू शिंदे, भीमाताई फुगे, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.
“दर्शन कॉलनी व बंसल विहार परिसरातील ड्रेनेज समस्या ही केवळ तांत्रिक बाब नसून नागरिकांच्या आरोग्याशी आणि दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. ही अडचण कायमस्वरूपी दूर व्हावी यासाठीच चेंबर लाईनचे काम प्राधान्याने हाती घेतले आहे. काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करून प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी वातावरण मिळेल, यासाठी मी कटिबद्ध आहे. नागरिकांनी निश्चिंत राहावे—प्रभागातील प्रत्येक मूलभूत सुविधेसाठी सातत्याने पाठपुरावा सुरूच राहील.”
– कविता भोंगाळे, नगरसेविका, प्रभाग-5.




