महापालिका करसंकलन विभागाच्या अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करा : नगरसेवक विकास डोळस
![CBI probe into municipal tax collection officials: Corporator Vikas Dolas](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/vikas-dolas-pcmc.jpg)
- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धाडीत सापडले दोन कर्मचारी
- विभागाचा कारभार सक्षम अधिकाऱ्याकडे सोपावण्याची मागणी
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका करसंकलन विभागाच्या आर्थिक कारभाराची सीबीआय मार्फत चौकशी करावी. फाईल्स गायब करणाऱ्या या विभागात भ्रष्टाचार फोफावला असून, एखाद्या सक्षम अधिकाऱ्याकडे कामकाज सोपवावे, अशी मागणी भाजपा नगरसेवक विकास डोळस यांनी केली आहे.
कर संकलन विभागाच्या थेरगाव येथील कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने धाड टाकून दोन कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागातील दोन कर्मचा-यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नुकतेच लाच घेताना रंगेहाथ पकडले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगाव कर संकलन कार्यालयातील लिपिक प्रदीप शांताराम कोठावडे आणि मुख्य लिपिक हायबती मोरे अशी त्यांची नावे आहेत.
दरम्यान, महापालिकेच्या करसंकलन विभागातील हा ‘भ्रष्टाचाराचा गोलमाल’ सर्वसामान्यांना नकोसा झाला असून या विभागाच्या प्रमुख पदावर बसलेल्यांनीच जाणीवपूर्वक नागरिकांना लुटण्यासाठी चालवलेली ही खेळी आहे आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या जागी तात्काळ सक्षम अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, पिंपरी-चिंचवडकरांकडून होत आहे.
भाजपा नगरसेवक विकास डोळस म्हणाले की, आम्ही महापालिकेच्या करसंकलन विभागातील विविध गैरप्रकारांबद्दल सातत्याने महापालिका आयुक्तांशी पत्रव्यवहार केला आहे. जेव्हा मिळकतींचे सर्वेक्षण करण्याचे काम खाजगी संस्थेला देण्याचा घाट घातला गेला. त्यावेळी आम्ही त्याला जाहीर विरोध केला. पुढे त्या खाजगी सर्वेक्षणातूनच एकूण १९ हजार ५०० मिळकतीची नोंद नसून त्यातील ६ हजार २८ निवासी मिळकती शिल्लक असल्याचे दिसून आले, शिवाय ५१ औद्योगिक मिळकतीचीही नोंद नसल्याचे स्पष्ट झाले. ज्या खात्यात सर्वसामान्य शहरवासीय आपला मिळकत कर भरतो ते खाते बँक ऑफ बडोदा या विश्वसनीय शासकीय बँकेऐवजी इतर खाजगी बँकेकडे देण्याला ही आम्ही कडाडून विरोध केला आहे.
फाईल्स गायब प्रकरणाचीही राज्य शासनाने चौकशी करावी…
लाच प्रकरणात दोन कर्मचारी सापडले आहेत. मात्र, खासगी संस्थेला काम देण्यात आले. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यास काही अधिकाऱ्यांची नावे समोर येतील. त्यामुळे तात्काळ महापालिका करसंकलन विभागाची जबाबदारी सध्याच्या विभागप्रमुखांकडून काढून घ्यावी व सक्षम अशा अधिकाऱ्यांकडे सोपवावी अशी मागणी आयुक्त राजेश पाटील यांना नगरसेवक विकास डोळस यांनी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून केली. तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिका कर संकलन कार्यालयातून मालमत्तेच्या फाईल गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. राज्य शासनाकडून नियुक्त अधिकारी या विभागाचा कारभार पाहतात. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारने तात्काळ करावी, अशी मागणीही भाजपा नगरसेवक विकास डोळस यांनी केली आहे.