आयुक्तालयाबाहेर बदली झालेल्या तीन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या रद्द; मॅटचे आदेश
![Cancellation of transfers of three police inspectors transferred outside the Commissionerate; Matt's orders](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/pimpri-chinchwad-police-commissionerate.jpg)
पिंपरी चिंचवड | ऑगस्ट 2021 मध्ये राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या. त्यात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चार पोलीस निरीक्षकांच्या आयुक्तालयाबाहेर बदली झाली. त्यातील तीन पोलीस निरीक्षकांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) मध्ये धाव घेतली. त्यांचा आयुक्तालयातील सेवाकाळ पूर्ण झाला नसल्याने मॅटने तीन निरीक्षकांच्या बदल्या रद्द करण्याचे आदेश दिले.ऑगस्ट 2021 मध्ये झालेल्या बदल्यांमध्ये पिंपरी चिंचवड मधील पोलीस निरीक्षक रंगनाथ बापू उंडे यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज, अमरनाथ रामचंद्र वाघमोडे यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज, सुनील जयवंत पिंजण यांची गुन्हे अन्वेषण विभाग, अजय हनुमंत भोसले यांची नवी मुंबई येथे बदली झाली होती. याच बदल्यांमध्ये राज्याच्या विविध भागातून 18 पोलीस निरीक्षकांच्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदल्या झाल्या होत्या.
बदली आदेशानुसार या पोलीस निरीक्षकांना पिंपरी- चिंचवड येथून कार्यमुक्त करण्यात आले होते. मात्र, यातील रंगनाथ उंडे, सुनील पिंजण आणि अमरनाथ वाघमोडे यांनी मॅटमध्ये धाव घेतली. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कार्यकाळ पूर्ण झाला नसल्याचा दावा करीत निरीक्षकांनी चिंचवडचे तत्कालीन पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे यांच्या जुन्या निकालाचा मॅटमध्ये दाखला दिला. या सर्व बाबींचा विचार करून मॅटने देखील त्यांचे म्हणणे मान्य करीत गृह विभागाने केलेल्या बदल्या रद्द केल्या. तसेच, त्यांना पुन्हा पिंपरी- चिंचवड आयुक्तलयात हजर करून घेण्याचे आदेश दिले.
मॅटच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक सुनील पिंजण, रंगनाथ उंडे आणि अमरनाथ वाघमोडे या तिघांना पिंपरी चिंचवड नियंत्रण कक्ष येथे हजर करून घेण्यात आले आहे.