पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्मच्या जागेवर नवीन रेल्वे जंक्शन उभारा…- लक्ष्मण जगताप
![पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्मच्या जागेवर नवीन रेल्वे जंक्शन उभारा...- लक्ष्मण जगताप](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/images-1-25.jpg)
- चिंचवड रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करा…
- आ. लक्ष्मण जगताप यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी…
पिंपरी |
आगामी रेल्वे अर्थसंकल्पात पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्म येथे नवीन रेल्वे जंक्शन विकसित करण्या साठी निधी मंजूर करण्यात यावा तसेच, चिंचवड रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रवाशांसाठी विविध सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. पत्रात त्यांनी म्हटले आहे कि, झपाट्याने विकसित होत असलेल्या उद्योग नगरी पिंपरी-चिंचवड शहराच्या लोकसंख्येत वाढ होत आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेले शहरीकरण आणि जिल्ह्याच्या वाढीमुळे शहरातील नागरिकांसाठी असलेले पुणे रेल्वे जंक्शन अपुरे पडत असल्याने पर्यायी जंक्शन विकसित करणे आवश्यक आहे.
पिंपरी येथील डेअरी फार्मसाठी संरक्षण विभागाला यापूर्वी देण्यात आलेली सुमारे ५० ते ६० एकर जमीन वापराविना पडून आहे. ही जमीन पुणे-मुंबई रेल्वे लाईनला लागून असून मध्यवर्ती आहे. नवीन जंक्शन विकसित करण्यासाठी या जमिनीचा वापर केल्यास पुणे पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांना रेल्वे प्रवास करणे सोयीचे होईल. पिंपरी जंक्शन विकसित करण्यासाठी निधी मंजूर व्हावा शिवाय पिं.चिं.मनपा हद्दीतील चिंचवड रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रवाशांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आ. जगताप यांनी पत्रात म्हटले आहे.