breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रिक्षा संघटनांच्या बोगस प्रतिनिधींनी रिक्षा चालकांना अडचणीत टाकले : बाबा कांबळे

  • नागरिकांच्या गैरसोयीसह हिंसक आंदोलन नको, अशी भूमिका घेतल्यानेच बदनामीचा प्रयत्न
  • रिक्षा चालकांच्या प्रश्नावर महाराष्ट्र रिक्षा पंचायत कायदेशीर मार्गाने लढा उभारणार

पिंपरी / प्रतिनिधी

कायदेशीर मार्गाने लढा उभारून देखील रिक्षा चालकांचे प्रश्न सोडविता येतात. त्यासाठी प्रशासन देखील सहकार्य करत असते. आंदोलन करत असताना नागरिकांची गैरसोय होऊ नये, याची खबरदारी रिक्षा चालकांनी घेतली पाहिजे. ही भूमिका महाराष्ट्र रिक्षा पंचायतची आहे. तसेच रिक्षांची तोडफोड, संप करण्यासाठी जबरदस्ती करून कायदा सुव्यवस्था बिघडवू नये, अशी भूमिका संघटनेने सातत्याने मांडली आहे. शहरातील नागरिकांनी देखील संघटनेच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. मात्र काही बोगस प्रतिनिधींनी रिक्षा संघटनांमध्ये प्रवेश करून आंदोलन भरकटवले असल्याचा आरोप महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. काही राजकीय पक्ष देखील स्वतःचा राजकीय स्वार्थ बघण्यासाठी रिक्षा चालकांना वेगळ्या दिशेला घेऊन जात आहेत. संघटनेसह वैयक्तिक मला बदनाम केले जात आहे. हे बोगस प्रतिनिधी रिक्षा चालकांना संकटात टाकून कायद्याच्या कचाट्यात सापडण्यास भाग पाडत आहेत. रिक्षा चालकांनी अशा बोगस प्रतिनिधींचा डाव उधळवून लावावा, असे आवाहनही बाबा कांबळे यांनी केले.

बाबा कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, विविध मागण्यांसाठी रिक्षा चालकांनी रिक्षा बंदची हाक दिली होती. रिक्षा चालकांच्या हितासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत देखील या आंदोलनात सक्रिय सहभागी झाले. त्यामुळे पुणे पिंपरी चिंचवड शहरात रिक्षा बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. हे आंदोलन कायदेशीर मार्गाने होणे गरजेचे असल्याचे वारंवार संघटनेच्या माध्यमातून सांगत आलो आहे. आंदोलन दरम्यान कुठेही गालबोट लागू नये यासाठी आवाहन करत होतो. मात्र काही रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेत तोडफोड करण्याची भूमिका घेतली. पिंपरी चिंचवड व पुण्यात जबरदस्तीने रिक्षा बंद करण्यात आल्या. काही ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या. तसेच काही राजकीय पक्षाच्या रिक्षा संघटना आपल्या राजकीय विरोधकांची कोंडी करण्यासाठी रिक्षा चालकांचा दुरोपयोग करत आहेत. रिक्षा चालकांना चुकीच्या मार्गाला घेऊन जात आहेत. त्यामुळे आंदोलनादरम्यान अनेक रिक्षा चालकांवर पोलिसांनी गुन्हे देखील दाखल केल्याच्या घटना घडल्या. ही बाब लक्षात” येताच महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्या वतीने चुकीच्या गोष्टींना विरोध केला असल्याचे बाबा कांबळे म्हणाले. लोकशाहीमध्ये कायदेशीर मार्गाने लढा दिल्यास यश मिळते ही भूमिका मांडली. तोडफोडीचा मार्ग योग्य नसल्याचे सातत्याने सांगितले. आपल्याच रिक्षा चालक असणाऱ्या बांधवांना न्यायालयीन प्रक्रियेत अडकविणे योग्य नसल्याचे सांगितले. आधीच कर्ज, महागाई, चुकीच्या प्रवासी कंपन्यांच्या वाहतुकीमुळे रिक्षा चालक बेजार आहे. त्यात चुकीच्या लोकांमुळे रिक्षा चालकांना आणखीन खड्डयात टाकण्याचे काम करण्यात आले. महाराष्ट्र रिक्षा पंचायतने चुकीच्या लोकांचे मनसुबे ओळखून विरोध केला. त्यामुळेच संघटना व वैयक्तिक बदनामी सुरु केल्याचा आरोप बाबा कांबळे यांनी केला.

रिक्षा चालकांना गुन्ह्यातून वगळा –

काही रिक्षा संघटना रिक्षाचे हॅन्डल लॉक करून रिक्षा रस्त्यामध्येच सोडून द्यायला भाग पाडत होते. असे आंदोलन करणाऱ्या रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या गोष्टी न करण्याची भूमिका महाराष्ट्र रिक्षा पंचायतने मांडली आहे. अशी भूमिका घेतल्याने रिक्षा चालकांच्या समितीमधून बाहेर काढले असल्याचे काही संघटना सांगत आहेत. असे असेल तर ज्या रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल झालेत त्यांना आता गुन्ह्यातून वगळा असे आवाहनही बाबा कांबळे यांनी केले आहे.

समितीतून बाहेर पडलो तरी लढा सुरूच –

रिक्षा चालकांना बळीचा बकरा बनविण्याचे काम काही संघटना करत आहेत. हे चुकीचे आहे. नागरिकांची गैरसोय होईल अशी भूमिका काही चुकीच्या रिक्षा संघटनांचे बोगस प्रतिनिधी घेत आहेत. तोडफोडीचा मार्ग अवलंबून कायदा सुव्यवस्था बिघडवणे हा रिक्षा संघटनांच्या आंदोलनाचा मुख्य उद्देश नाही. त्याला महाराष्ट्र रिक्षा पंचायत कधीच पाठिंबा देणार नाही. काही चुकीची माणसे रिक्षा संघटनांच्या समितीत दाखल झाल्याने महाराष्ट्र रिक्षा पंचायत समितीमधून बाहेर पडत असल्याचे मी स्वतः जाहीर केले आहे. समितीमधून बाहेर पडलो असलो तरी रिक्षा चालक, मालक यांच्या मागणीसाठी, प्रश्नांसाठी कायदेशीर मार्गानेच लढा उभारून यश मिळवून देऊ, असे बाबा कांबळे म्हणाले. ज्यांना ही भूमिका योग्य वाटते त्या रिक्षा चालक बांधवांनी साथ द्यावी, असे आवाहन बाबा कांबळे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button