भाजपाच्या निशा यादव यांचा संकल्प : प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोतोपरी कटिबद्ध !
कुदळवाडी येथे भैरवनाथ महाराजांच्या साक्षीने दिनदर्शिकाचे उत्साहात लोकार्पण
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी । चिखली गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांच्या साक्षीने प्रभाग क्रमांक ११ च्या इच्छुक उमेदवार सौ. निशा (निशाताई) दिनेश यादव यांच्या दिनदर्शिकेचे लोकार्पण सोहळा आज उत्साहात पार पडला. इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी आयोजन केलेल्या या कार्यक्रमात स्थानिक महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. कुदळवाडी परिसरातील ग्रामस्थांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री भैरवनाथ महाराजांच्या पूजनाने झाली. त्यानंतर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आणि पदाधिकाऱ्यांनी निशाताई यादव यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत त्यांचे स्वागत केले. दिनदर्शिकेमध्ये प्रभागातील उपयुक्त माहिती, सामाजिक उपक्रमांचे दर्शन आणि स्थानिक प्रश्नांवर प्रकाश टाकणारी माहिती समाविष्ट असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सौ. निशाताई यादव या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दिनेश यादव यांच्या सौभाग्यवती असून, भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रमांत त्या सक्रिय आहेत. महिलांच्या सबलीकरणासाठी, प्रभागातील स्वच्छता मोहिमा, स्थानिक विकासकामे आणि नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केल्याचे ग्रामस्थांनी यावेळी नमूद केले.
लोकार्पण सोहळ्यानंतर निशाताई यादव यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला. ‘‘प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांचे प्रश्न, सुविधा आणि विकासकामे यांना प्राधान्य देणार आहोत. सर्वांनी साथ दिल्यास आपला प्रभाग आदर्श बनविण्यात आम्ही नक्की यशस्वी होऊ,’’ असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाच्या शेवटी इंद्रायणी महिला प्रतिष्ठानतर्फे उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
“प्रभाग क्रमांक ११ मधील प्रत्येक नागरिकाचा प्रश्न हा माझा स्वतःचा प्रश्न आहे. विकासकामे, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा आणि तरुणांसाठी संधी—या सर्व गोष्टींना प्राधान्य देत प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आपल्या विश्वासाची आणि सहकार्याची साथ मिळाली, तर आपल्या प्रभागाला आदर्श प्रभाग बनवणे हे स्वप्न निश्चितपणे साकार होईल.
– निशा यादव, अध्यक्षा, इंद्रायणी महिला प्रतिष्ठान.




