TOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडपुणे

पुणे जिल्ह्यात भाजप खांदेपालट करणार! महेश लांडगे यांचा कार्यकाळ पूर्ण!

राहुल कुल, आशा बुचके यांची नावं आघाडीवर, पिंपरी-चिंचवडचा पुढचा अध्यक्ष कोण?

पिंपरी चिंचवड / पुणे :

पुणे जिल्ह्यात भाजपमध्ये मोठी खांदेपालट होण्याची शक्यता आहे. भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांचा कार्यकाळ संपल्याने जिल्हाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तर पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांचा देखील कार्यकाळ संपल्यानंतर पिंपरी चिंचवडचा शहराध्यक्ष देखील बदलण्याची हालचाल सुरु झाली आहे. तर कसब्यातील पराभवानंतर पुण्याचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची खुर्ची देखील डोक्यात आली आहे. गणेश भेगडे हे पक्षाचे सध्या जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपला असून, नवे अध्यक्ष लवकरच निवडले जाणार आहे. नव्या नावांमध्ये प्रामुख्याने दौंडचे आमदार राहुल कुल, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद बुट्टे पाटील, आशाताई बुचके आणि सध्याचे संघटन सरचिटणीस ॲड. धर्मेंद्र खांडरे यांच्या नावाची प्रामुख्याने चर्चा आहे.

लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत आपल्यााला तिकीट मिळेल, अशी आशा शंकर जगताप यांना होती. मात्र सहानुभूतीची लाट पाहून पक्षनेतृत्वाने लक्ष्मण भाऊंच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली. दोन महिन्यांपूर्वी उमेदवारी हुकली पण आपल्या नेतृत्वगुणांनी शंकर जगताप यांनी वहिनींना निवडून आणलं. आता स्वत: देवेंद्र फडणवीस तीच कसर भरुन काढण्याच्या तयारीत आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर शहराला मिळणार नवा शहराध्यक्ष
पुणे : राज्यात भाजपाकडून संघटनात्मक पुर्नबांधणी करण्यात येत असून, ज्या शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विभाग प्रमुखांचा कार्यकाळ संपला आहे, त्यांचे राजीनामे घेण्यात येत आहेत. सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यानंतर शहराध्यक्षपदासाठी घोषणा होईल, असा दावा केला जात आहे. त्यानुसारच आता भाजपचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या कार्यकाळ पूर्ण झाल्याने पिंपरी-चिंचवड भाजपला अधिवेशनानंतर नवा शहराध्यक्ष मिळणार आहे.

पुणे भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळा (गणेश) भेगडे यांच्याबरोबरच पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांचा देखील कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे प्रदेश भाजपाकडून आलेल्या संघटनात्मक सूचनांनुसार, पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष व भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आपल्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, असे खात्रीलायक वृत्त आहे. राज्यात भाजपाकडून संघटनात्मक पुर्नबांधणी करण्यात येत असून, ज्या शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विभाग प्रमुखांचा कार्यकाळ संपला आहे, त्यांचे राजीनामे घेतले जातायेत. सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यानंतर शहराध्यक्षपदासाठी घोषणा होईल, असं सांगितलं जातंय.

२०१७ मधील महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने पिंपरी-चिंचवडमध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पराभव केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर शहराध्यक्षपदाची धुरा आमदार महेश लांडगे यांच्याकडे सोपवण्यात आली. शहराध्यक्ष पदाचा ३ वर्षांचा कार्यकाळ संपल्यामुळे आता नवीन शहराध्यक्ष कोण होणार? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

भावाच्या जागेवरची उमेदवारी हुकली, पण आता फडणवीस कसर भरुन काढणार?
दरम्यान, लक्ष्मण जगताप आजारी असल्याने त्यांचे बंधू शंकर जगताप यांची चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ३ जानेवारी २०२३ रोजी जगताप यांचे निधन झाले. महिन्याभरात पोटनिवडणूक लागली. या निवडणुकीत अश्विनी जगताप यांना भाजपाची उमेदवारी मिळाली. शंकर जगताप यांनी नेतृत्व कौशल्य दाखवले आणि भाजपचा विजय सोपा केला. नुकत्याच झालेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये ‘जगताप पॅटर्न’मुळे निवडणूक जिंकली, असा दावा शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राउत यांनी केला होता. त्यामुळे चिंचवडमध्ये भाजपची नव्हे, तर जगताप कुटुंबियांची ताकद जिंकली, अशी चर्चा आहे. त्यामुळे शंकर जगताप यांना शहराध्यक्षपदी ताकद देवून भाजपा पक्षश्रेष्ठी आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीची तयारी करणार, असे सांगितले जात आहे.

राहुल कुल, आशा बुचके यांची नावं आघाडीवर
पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. पुण्यातील प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी काम करते. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुका पाहता भाजपला जिल्हाध्यक्ष म्हणून फक्त विधानसभा मतदारसंघापुरता मर्यादित नेता नको आहे. म्हणूनच राहुल कुल, आशा बुचके, शरद बुट्टे आणि धर्मेंद्र खांडरे यांसारख्या बड्या नेत्यांची नावं भाजपचे वरिष्ठ नेते तपासून पाहत आहेत. त्यात राहुल कुल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. शरद बुट्टे पाटील हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. जिल्हा परिषदेच्या कामाचा अनेक वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. त्याचबरोबर राजगुरुनगर तालुक्यातला राजकारणात त्यांचा चांगला अभ्यास आहे. भाजपच्या पक्ष संघटनेतदेखील ते अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. आमदार कुल यांच्याप्रमाणेच बुट्टे पाटील देखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळचे मानले जातात. दुसरीकडे, आशा बुचके या जिल्हा परिषदेत माजी सदस्य आहेत. शिवसेनेतून दीड वर्षांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. जुन्नर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीसाठी अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतरदेखील त्यांच्या पदरात अद्याप यश आलेलं नाही. जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून त्या अनेक वर्ष काम करतायेत. लढाऊ कार्यकर्त्या अशी त्यांची ओळख आहे. जिल्हाध्यक्षांच्या स्पर्धेत विद्यमान संघटन सरचिटणीस ॲड. धर्मेंद्र खांडरे यांच्या नावाची देखील चर्चा आहे. ॲड. खांडरे हे मूळ संघ स्वयंसेवक आहेत. संघाच्या अधिवक्ता परिषद या वकीलांच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button