ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सिलेंडर घेताना काळजी घ्या

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरात बेकायदेशीरपणे, धोकादायकरीत्या गॅस चोरण्याचे प्रकार वाढत आहेत. व्यावसायिक सिलेंडर मधून गॅस चोरी करताना पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे. आता हे चोरटे थेट गॅसच्या टँकरमधून गॅस चोरी करू लागले आहेत. गॅस चोरी करून भरलेले सिलेंडर हे चोरटे मोठ्या किमतीत काळ्या बाजारात विकतात. याचाच दुसरा भाग नागरिकांच्या पथ्यावर पडत आहे. कमी भरलेले सिलेंडर नागरिकांना पुरविल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सिलेंडर घेताना काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करून तिघांना अटक केली आहे. हे तिघेजण गॅस वाहून नेणा-या कॅप्सूल टँकरमधून धोकादायकरीत्या गॅस काढत होते. गॅस काढत असताना तिघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याकडून एक कोटी दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मागील काही दिवसांपूर्वी सांगवी परिसरात धोकादायकपणे घरामध्ये मोठ्या सिलेंडरमधून लहान सिलेंडरमध्ये गॅस चोरी करताना स्फोट झाला. या स्फोटात दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांच्यामुळे त्यांच्या आणि परिसरातील अन्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला. तसेच त्यांनी सिलेंडरमधून गॅसची चोरी केली. याबाबत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासोबतच शहरात अनेक ठिकाणी मोठ्या व्यावसायिक सिलेंडरमधून लहान सिलेंडरमध्ये गॅस चोरी करून काढल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. सिलेंडरमधून गॅस चोरी केल्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होतो. त्यांना गॅस एजन्सीकडून दिले जाणारे सिलेंडर पूर्ण भरलेले नसतात. त्यामुळे नागरिकांनी सिलेंडर घेताना त्याचे वजन करून घेणे आवश्यक आहे. गॅस एजन्सीच्या प्रतिनिधीला सिलेंडर मोजून देण्याची मागणी ग्राहकांनी करायला हवी.

काही ठिकाणी ग्राहक गॅस एजन्सीच्या प्रतिनिधीला सिलेंडर मोजून देण्यास सांगतात. मात्र संबंधित एजन्सीच्या प्रतिनिधीने सिलेंडर मोजून न देता माघारी जातो. तो परत येतच नाही. अनेकजण ग्राहकांशी अरेरावी करतात. मोजून देण्यास टाळाटाळ करतात. यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. पोलिसांनी केलेल्या कारवायांमध्ये अनेक घटनांमध्ये गॅस एजन्सी चालकाचा देखील सहभाग आढळला आहे. त्यांच्या आशीर्वादाने हे प्रकार सुरु असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

नागरिकांनी गॅस सिलेंडर तपासून आणि वजन करून घ्यावेत. जर एजन्सीच्या प्रतिनिधीने सिलेंडर मोजून देण्यास नकार दिला, सिलेंडरचे वजन कमी असेल तर संबंधित प्रतिनिधी, एजन्सी चालकाच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांनी जागरूक होऊन यामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले आहे.

‘त्या’ प्रभा-यांवर कारवाईची टांगती तलवार

चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामाजिक सुरक्षा विभागाने गॅस चोरीची मोठी कारवाई केली. एवढा मोठा गैरप्रकार सुरु असताना स्थानिक पोलिसांना त्याची कुणकुण देखील लागली नाही. सामाजिक सुरक्षा विभाग शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील माहिती काढून कारवाई करीत आहेत. याची स्थानिक पोलिसांना माहिती नसते. त्यामुळे स्थानिक पोलिसांचे नेटवर्क ढासळत आहे. अथवा त्यांच्या आशीर्वादाने हे प्रकार सुरु आहेत.

याबाबत पोलीस आयुक्त चौकशी करत असून स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने असे गैरप्रकार सुरु असतील तर संबंधित पोलीस प्रभा-यांवर कारवाई होणार असल्याचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले. चाकण येथील कारवाईच्या बाबतीत पोलीस आयुक्तांनी चाकणच्या पोलीस निरीक्षकांकडून अहवाल मागवला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button