चिखलीत 3-4 जणांच्या टोळक्याकडून सलून दुकानदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/Marhan-3.jpg)
पिंपरी – टाईमपास करण्यासाठी दररोज दुकानात येऊन शिवीगाळ करणे तसेच, टॉलेटचा वापर करून अस्वच्छ केल्याचा राग व्यक्त केल्याने, 3-4 जणांच्या टोळक्याने चिखलीत एका सलून दुकानदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. स्वप्ननगरी कॉलनी, टॉवर लाईन, चिखली येथे मंगळवार (दि.30) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला.
याप्रकरणी अझरुद्दीन नसिब शेख (वय 29, रा. स्वप्ननगरी कॉलनी, टॉवर लाईन, चिखली) यांनी शुक्रवारी (दि.03) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश तोरसकर, ओंकार गाढवे, लव (पूर्ण नाव माहीत नाही) (रा. पत्रा शेड, यमुना नगर, निगडी) आणि एक रिक्षावाला यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 307, 504, 506 व 34 अंतर्गत खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अझरुद्दीन यांचे स्वप्ननगरी कॉलनी, टॉवर लाईन, चिखली येथे सलूनचे दुकान आहे. यातील आरोपी टाईमपास करण्यासाठी दुकानात येऊन एकमेकांना शिवीगाळ करतात तसेच, शेजारी असलेल्या टॉलेटचा वापर करून ते अस्वच्छ करतात.
याबाबत फिर्यादी यांनी सर्वांना सांगितले की, ‘तुम्ही वापरलेले टॉलेट मलाच स्वच्छ करावे लागते, तसेच तुम्ही शिवीगाळ करता त्यामुळे दुकानात गि-हाईक येत नाही.’ असे बोलल्याने आरोपींना राग आला व त्यांनी फिर्यादी यांना दुकानाबाहेर घेऊन आरोपी ओंकार गाढवे याने तुला आज खल्लास करतो असे म्हणून, त्यांच्या डोक्यात फरशी मारली. त्यानंतर सर्वांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व पाठीत दगड मारला. फिर्यादी यांनी जीव वाचवण्यासाठी तिथून पळून गेले. चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.