वारंवार घरी येऊन त्रास देत असल्याने महिलेने साथीदारांच्या मदतीने केला तरुणाचा खून
दोघांना अटक, गुंडा विरोधी पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे काढला माग
पिंपरी : वारंवार घरी येऊन त्रास देत असल्याने महिलेने आणि तिच्या अल्पवयीन मुलीने अन्य चार साथीदारांच्या मदतीने तरूणाचा मारहाण करून निघृणपणे खून केला. त्यानंतर अपघाताचा बनाव रचून त्याला महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात दाखल करून पसार झाले. कोणताही पुरावा नसताना पिंपरी – चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे आणि इमारतीतील लिफ्टमध्ये आढळलेल्या रक्ताच्या डागावरून आरोपींचा माग काढत दोन जणांच्या मुसक्या आवळल्या. महिलेसह तीन आरोपी पसार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलीसांचे पथक बीड येथे रवाना झाले आहे.
बालाजी उर्फ बाळू मंचक लांडे (२८) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. रिक्षाचालक दिनेश सूर्यकांत उपादे (वय २८, रा. आदर्शनगर, पिंपळे निलख), आदित्य शरद शिंदे (वय २५, रा. स्वराज हाऊसिंग सोसायटी, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे. महिलेसह तिचे तीन साथीदार पसार आहेत. बालाजी हा मुळचा बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड या गावचा. आरोपी महिला हीसुद्धा त्याच्या गावाकडील आहे. बालाजी हा गेल्या तीन वर्षापासून रांजणगाव एमआयडीसीत नोकरी करत होता. महिलेची आणि त्याची ओळख असल्याने त्याचे तिच्या घरी येणे – जाणे होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो दारू पिऊन महिलेच्या घरी येऊन तिला आणि तिच्या अल्पवयीन मुलीला त्रास देत असे. या त्रासाला महिला वैतागली होती. त्यातून तिने बालाजीला जीवे मारण्याचा कट रचला. १७ जानेवारी रोजी बालाजी महिलेच्या घरी आला. यावेळी महिलेसह तिच्या चार साथीदारांनी बालाजी याला बेदम मारहाण केली. आरोपी उपादे याच्या रिक्षातून गंभीर जखमी अवस्थेतील बालाजीला महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयात दाखल केले. दाखल करणार्या दोघांनी आपली नावे खोटी सांगितली आणि दोघेजण पळून गेले. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच बालाजी याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. बालाजीच्या संपूर्ण अंगावर, डोक्यावर मारहाणीच्या गंभीर जखमा आढळून आल्या.
हेही वाचा : शेतकरी कुटुंबातील आयटीएन्स धनेश इंदोरे याचा प्रवास प्रेरणादायी!
दरम्यान, १७ जानेवारी रोजी दुपारपासून बालाजीचा मोबाईल बंद होऊन तो बेपत्ता झाल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला. त्याचा चुलत भाऊ परशुराम विलास लांडे हा पुण्यात त्याचा शोध घेत होता. त्याने सोमवारी (दि. २०) पोलिसांच्या पोर्टलवर ऑनलाईन मिसिंगची तक्रार दाखल केली. तासाभरात परशूराम यांना पिंपरी – चिंचवड गुन्हे शाखेने संपर्क साधला. वायसीएम रूग्णालयात बोलावून घेऊन मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. बालाजी चिखली घरकुल येथे गेल्याची माहिती मिळाल्याने गुंडा विरोधी पथकाने घरकुल येथे जाऊन तपास सुरु केला. एका लिफ्टमध्ये रक्ताचे डाग दिसले. त्यावरून पोलिसांनी चौकशी करत या गुन्ह्याचा छडा लावला. महिलेच्या घरातून तिच्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केल्यानंतर उपादे व शिंदे याला अटक करण्यात आली. दोघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयान दिले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक हरीश माने, फौजदार अशोक जगताप, पी. पी. तापकीर, एस. एन. ठोकळ, एच. व्ही. जगदाळे, ए. पी. गायकवाड, पोलीस अंमलदार जी. एस. मेदगे, जी. डी. चव्हाण, एस. डी. चौधरी, व्ही. टी. गंभीरे, एस. पी. बाबा, एन. बी. गेंगजे, व्ही. डी. तेलेवार, दळवी, व्ही. एन. वेळापुरे, एस. टी. कदम, टी. ई. शेख, माने यांनी केली.