दोन वर्षांनी होणार पायी आषाढी वारी; माऊलींच्या पालखीचे कधी होणार प्रस्थान
![Ashadhi Wari will be held in two years; When will the departure of Mauli's palanquin take place?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Ashadhi-Wari-will-be-held-in-two-years.jpg)
पिंपरी चिंचवड| करोनाच्या संकटामुळे आषाढीच्या पायी वारीला खंड पडलेला होता. मात्र आता करोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे यंदा मात्र ही पायी वारी निघणार आहे. २१ जूनला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करेल अशी घोषणा करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याबाबत माहिती देताना सोहळ्याचे प्रमुख अॅड. विकास ढगे-पाटील म्हणाले की, पालखी २१ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करेल. पालखी साताऱ्यातील लोणंद येथे अडीच दिवस, फलटणला दोन दिवस मुक्काम करेल, अशी माहितीही ढगे-पाटील यांनी दिली. या घोषणेमुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली श्री क्षेत्र पंढरपूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आषाढी वारी पायी दिंडी पालखी सोहळा नियोजनाची बैठक पार पडली. या बैठकीला श्रीमंत उर्जितसिंह शितोळे, प्रमुख विश्वस्थ योगेश देसाई, विश्वस्थ डॉ. अभय टिळक, ह.भ.प नामदेव महाराज वासकर, राणू महाराज वासकर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ माऊली जळगावकर, दिंडी समाजाचे अध्यक्ष भाऊ महाराज गोसावी, सचिव मारुती कोकाटे, बाळासाहेब रंदवे, भागवत चवरे, भाऊ फुरसुंगीकर, सोपानकाका टेंबुकर, गुरुजीबुवा राशिनकर, शरद गायकवाड, बाळासाहेब उकळीकर, एकनाथ हांडे, दिनकर वांजळे, राजाभाऊ थोरात, बाळासाहेब वांजळे, व्यवस्थापक माऊली वीर, सह व्यवस्थापक श्रीधर सरनाईक होते. तसेच या बैठकीला दिंडी प्रमुख आणि फडकरी देखील उपस्थित होते.
आषाढी पायी पालखी सोहळ्याचे वेळापत्रक
> २१ जून – पालखी सोहळ्याचे आळंदी येथून संध्याकाळी चार वाजता प्रस्थान.
> २२ व २३ जून- पुणे
> २४ व २५ जून- सासवड
> २६ जून- जेजुरी
> २७ जून- वाल्हे
> २८ व २९ जून- लोणंद
> ३० जून- तरडगांव
> १ व २ जुलै- फलटण
> ३ जुलै- बरड
> ४ जुलै- नातेपुते
> ५ जुलै- माळशिरस
> ६ जुलै- वेळापूर
७ जुलै- भंडीशेगाव
> ८ जुलै- वाखरी
> ९ जुलै- श्री क्षेत्र पंढरपुर मुक्कामी.
> १० जुलै- आषाढी एकादशीचा महासोहळा.
येथे होईल अश्वांचे उभे रिंगण
> चांदोबाचा लिंब
> बाजीराव विहीर
> इसबावी
येथे होईल अश्वांचे गोल रिंगण
>पुरंदावडे ( सदशिवनगर )
> पानीव पाटी
> ठाकुरबुवा
> बाजीराव विहीर