अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे वाहन मालकांना आवाहन
![Appeal to vehicle owners to release stranded vehicles](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/FB_IMG_1637592556339.jpg)
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने थकीत कर वसुलीसाठी मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यातंर्गत कार्यालयाच्या आवारात वाहन मालक किंवा चालक यांच्या जबाबदारीवर अटकावून ठेवलेली वाहने वाहन मालकांनी मोटार वाहन कर व दंड भरुन येत्या 7 दिवसांत सोडवून घ्यावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.कार्यालयाने मोटार वाहन थकीत कराच्या वसुलीसाठी अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या जाहीर लिलावाची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यापैकी 27 वाहनांच्या मालकांना नोटीस पाठविल्या होत्या पण, वाहन मालक नोंदणीकृत पत्त्यावर आढळून न आल्याने अशा नोटीस वाहन मालकांना पोच झाल्या नाहीत. अशा वाहनांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित केली आहे.
मोटार वाहन कायद्यातील तरतूदीनुसार वाहन मालकांनी नोंदणी प्रमाणपत्रावर पत्ता बदल केल्यानंतर याबाबत नोंद 7 दिवसात करावयाची आहे. परंतू पत्ता बदल नोंद न केल्याने वाहन मालकांच्या नवीन पत्त्यावर पत्रव्यवहार करता येत नाही तसेच त्यांच्यासोबत संपर्कही होत नाही. अशा वाहन मालकांनी लवकरात लवकर कार्यालयास संपर्क साधावा, अन्यथा ही वाहने बेवारस वाहने असल्याचे समजून सक्षम प्राधिकारी यांच्या परवानगीने अशा वाहनांचा जाहीर ई-लिलाव करण्यात येईल, असे उप प्रादेशिक कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.