चऱ्होलीतील सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा साळुंके यांच्याकडून सेवाभावी वृत्तीचे आदर्शवत उदाहरण
सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा साळुंके यांनी रक्तदान करत दिले रुग्णाला जीवनदान

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
चऱ्होली परिसरातील अनुराधा साळुंके यांनी एका गंभीर रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी केलेली धावपळ आणि तत्परता सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे. परिसरातील एका व्यक्तीची प्रकृती अचानक बिघडली आणि त्याला तातडीने रक्ताची आवश्यकता भासली. रुग्णालयाच्या रक्तपेढीत आवश्यक रक्तगटाचा साठा उपलब्ध नसल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली होती.
ही बाब कळताच चऱ्होलीतील अनुराधा साळुंके यांनी एक क्षणही दवडला नाही. आणि तातडीने रुग्णालयात धाव घेतली. साळुंके यांचा रक्तगट ओ निगेटिव्ह असल्याने तो रुग्णाच्या आवश्यकतेशी जुळत असल्याची माहिती मिळताच त्यांनी तत्परतेने रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. रुग्णालयात पोहोचल्यावर सर्व वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी आवश्यक ते रक्त देऊन रुग्णाला दिलासा मिळवून दिला.
अनुराधा साळुंके यांचे रुग्णांच्या नातेवाईकांनी आभार मानले. योग्य वेळी आमच्या पेशंटला रक्त मिळाले. हे आमच्या साठी अत्यंत महत्वाचे ठरले आणि त्यामुळे आमच्या रुग्णांचा जीव वाचवण्यात मोठी मदत झाली.
हेही वाचा : नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
अनुराधा साळुंके यांच्या या कृतीमुळे एका कुटुंबावर आलेले संकट दूर झाले असून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.परिसरातील नागरिक, समाजसेवी संस्था आणि स्थानिक प्रतिनिधींनी त्यांच्या या मदतीचे मनापासून कौतुक केले आहे. मदतीला तत्पर राहणारी त्यांची वृत्ती आणि समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा प्रेरणा देणारी असल्याचे सर्वांनी नमूद केले आहे.
संकटाच्या काळात मदतीला धावून जाणारी सेवाभावी वृत्ती
अनुराधा साळुंके यांचे हे कार्य मानवतेचा खरा अर्थ अधोरेखित करणारे आहे. संकटाच्या काळात मदतीला धावून जाणाऱ्या अशा व्यक्तींमुळे समाज अधिक संवेदनशील आणि सशक्त बनतो. ही भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या सेवाभावी कृतीमुळे चऱ्होली परिसरात मानवतेचा उज्ज्वल संदेश पोहोचला आहे.




