अण्णा बनसोडे गोळीबार प्रकरण.! माझ्या पतीला न्याय द्या, ‘त्या’ महिलेची गृहमंत्र्याकडे मागणी
![Anna Bansode shooting case.! Give justice to my husband, 'that' woman's demand to the Home Minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/aa-24-800x445-1.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे कथित गोळीबार प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. कंत्राटदार अँथोनी यांचा मॅनेजर तानाजी पवारसह तिघांवर जीवे मारण्याच्या उद्देशाने आमदार आणि त्यांच्या मुलाच्या दिशेने गोळीबार केल्याचा आरोप आहे. तर आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे आणि त्यांच्या पीएसह २१ जणांवर अपहरण आणि जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप तानाजीने केला आहे. या प्रकरणी तानाजीच्या पत्नी सविता पवार यांनी राज्याच्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे ‘माझ्या पतीला न्याय द्या’ या मागणीचे निवेदन दिले आहे.
सविता पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझे पती तानाजी पवार हे (माजी सैनिक, भारतीय सैन्यदल) अँटनी वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीत व्यवस्थापक या पदावर गेली २ वर्ष झाले कार्यरत आहेत. त्यानिमित्ताने सातत्याने स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून वारंवार विविध कारणासाठी तानाजीला त्रास देणे सुरू असायचे. त्यातच दोन दिवसांपासून कोणत्या तरी तणावाखाली असल्याची चाहूल मला लागली होती. परंतू, लहान मुलं असल्याकारणाने त्यांनी मला सांगण्याचे टाळले. त्यातच मला कळाले की ११ मे रोजी त्यांच्या कार्यालयात तीन कर्मचाऱ्यांना गंभीर बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर दोन दिवस सावटाखाली गेले.
१२ मे रोजी दुपारच्या सुमारास झालेला प्रकार मिटवण्याच्या उद्देशाने स्थानिक आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाकरवी अपहरण करून जीवे मारण्याच्या उद्देशानेच जनसंपर्क कार्यालयात मारहाण केल्यानंतर माझे पती तानाजी पवार यांनी स्वत:चा जीव वाचवण्याच्या उद्देशाने परवानाधारक पिस्तूलाने हवेत गोळीबार केला. माझे पती निर्दोष आहेत. त्यांना लवकरात लवकर न्याय द्या, असे सविता पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.