Admission : जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल ॲन्ड ज्युनियर कॉलेजची सोडत!
प्रशासनाची माहिती: १७२ प्रवेश अर्जांपैकी १६० विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित
![Admission: Lottery of Jagadguru Sant Tukaram Maharaj Santpeeth School and Junior College!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Santhpith-chikhali-780x470.jpg)
पिंपरी: शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये नर्सरी वर्गासाठी आलेल्या एकूण ३१५ अर्जांपैकी सर्व नियमात बसणारे १७२ प्रवेश अर्जांपैकी जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल ॲन्ड ज्युनियर कॉलेज ची प्रवेश संख्या सोडत पद्धतीने १६० विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संचलित पाटीलनगर टाळगाव चिखली येथे जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ कंपनी कायदा २०१३ च्या कलम ८ अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे. तसेच जगदगुरू संत तुकाराम महाराज संतपीठ अंतर्गत सुरू झालेले स्कूल ॲन्ड ज्युनियर कॉलेज हे महाराष्ट्र स्वयं अर्थसंहाय्यित शाळा (स्थापना व विनिमय) नियम २०१२ अंतर्गत स्वयं अर्थसहाय्यित तत्वावर चालविण्यात येत आहे.
जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल ॲन्ड ज्युनियर कॉलेज, पाटीलनगर, टाळगाव चिखली येथे शनिवार, दि. २७/०१/२०२४ रोजी विद्यार्थी प्रवेशाची सोडत पालकांच्या संमतीने व मान्यवरांसह पालकांच्या हस्ते पार पाडण्यात आली. याप्रसंगी संतपीठाचे संचालक राजूमहाराज ढोरे, डॉ.स्वाती मुळे संतपीठ प्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर गाडगे, मुख्याध्यापिका स्नेहल पगार, समन्वयिका मयुरी मुळूक आदी मान्यवर, संतपीठ कर्मचारी वृंद यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून विद्यार्थी सोडत पद्धत सुरु करण्यात आली.
पारदर्शीपणे प्रवेश प्रक्रिया…
जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल ॲन्ड ज्युनियर कॉलेज, पाटीलनगर टाळगाव चिखली येथे शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये नर्सरी वर्गाच्या प्रवेश प्रक्रियेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर शाळेमध्ये उच्च दर्जाचे शिक्षण मिळत असल्याने पालकांचा पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे संतपीठाच्या संचालकांनी सांगितले. निर्धारित केलेल्या प्रवेश क्षमतेपेक्षा दुपटीने अर्ज आल्याने ही प्रक्रिया व्यवस्थापनाच्या सूचनेनुसार सोडत पद्धतीने अतिशय पारदर्शी वातावरणात पार पडली.