महाळुंगे इंगळे येथे सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई; एकास अटक
पिंपरी l प्रतिनिधी
गुटखा विक्री करणा-या एकाला पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली. त्याला गुटखा विकण्यासाठी तसेच साठवणूक करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबाबत दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 9) सकाळी महाळुंगे इंगळे येथे करण्यात आली.
धर्माराम मयाराम चौधरी (वय 45, रा. एच पी ठाकरवाडी, महाळुंगे इंगळे), ओमजी बिष्णोई (वय 45, रा. खालूंब्रे), रामचंद्र काळे (वय 45, रा. ठाकरवाडी, महाळुंगे इंगळे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यातील धर्माराम याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई अतुल लोखंडे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओमजी आणि रामचंद्र या दोघांनी आरोपी धर्माराम याला गुटखा विक्री आणि साठवणूक करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. आरोपी धर्माराम याने प्रतिबंधित गुटख्याची विक्री केली. याबाबत माहिती मिळाली असता सामाजिक सुरक्षा विभागाने छापा मारून कारवाई करत दोन लाख 95 हजार 699 रुपयांचा गुटखा जप्त केला. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.