सेल्समन तरुणाने पळवला 61 हजारांचा ऐवज
पिंपरी l प्रतिनिधी
जुन्या साड्या घेऊन त्या बदल्यात प्लास्टिक भांडी देणा-या एका तरुणाने घरात येऊन घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 61 हजार 560 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 22 मे रोजी दुपारी रुपीनगर तळवडे येथे घडली.
संजय मलाकांत भारे (वय 26, रा. काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी जिजा सुरेश सिरसाठ (वय 52, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा जुन्या साड्या घेऊन त्या बदल्यात प्लास्टिक भांडी देण्याचा व्यवसाय करतो. तो फिर्यादी यांच्या घरी आला. फिर्यादी या त्याला जुन्या साड्या देण्यासाठी कपाटातून जुन्या साड्या काढत असताना आरोपीने फिर्यादी यांच्या घरात प्रवेश करून 30 हजारांचे सोन्याचे गंठन, 30 हजारांची एक बोरमाळ आणि एक हजार 560 रुपये असा एकूण 61 हजार 560 रुपयांचा ऐवज असलेली पर्स चोरून नेली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.