एमआयटी आळंदीचा विद्यार्थी आज आंतरराष्ट्रीय संगीतविश्वात झळकतोय
शिक्षण विश्व : संघर्षातून घडलेला सूरांचा प्रवास

पिंपरी-चिंचवड | आळंदी येथील एमआयटी कॉलेज ऑफ आळंदी मधील २०१२-१३ च्या बी.एससी. (कॉम्प्युटर सायन्स) शाखेचा विद्यार्थी आशुतोष सुरजूसे याने आपल्या अथक मेहनतीच्या जोरावर संगीतविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच त्याने संगीत क्षेत्रात मोठी झेप घेत महाविद्यालयाचे नाव राज्यासह देशभर पोहोचवले.
आशुतोषच्या यशामागे त्याची जिद्द, सातत्य आणि संगीतावरील निस्सीम प्रेम आहे. कॉलेजचे डायरेक्टर डॉ वाफारे सर यांचे त्याला विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच अमित टाळे सर आणि मयुरी बापट मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने अनेक संगीत स्पर्धांमध्ये सहभाग घेत उल्लेखनीय यश मिळवले.
आशुतोषचा संगीत प्रवास घरातूनच सुरू झाला. त्याचे पहिले गुरु म्हणजे त्याचे वडील अरुण सुरजूसे. वडिलांना गाताना पाहूनच त्याच्या मनात संगीताची आवड निर्माण झाली. त्याची आई संगीत विशारद असल्यामुळे त्याला शास्त्रीय संगीताचे धडे घरातूनच मिळाले. तसेच त्याचे मामा विठ्ठल दानव आणि आजोबा स्वर्गीय गणपतराव दानव यांनी त्याला तबल्याचे संस्कार दिले.
हेही वाचा
पुणे RMC असोसिएशनकडून अद्ययावत कामकाजाच्या वेळा जाहीर!
पुण्यात डॉ. रवींद्र घांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने संगीत विशारद पदवी पूर्ण केली. त्याचबरोबर प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्याकडे एक वर्ष संगीताची तालीम घेत त्याने आपल्या गायकीला अधिक धार दिली.
आजपर्यंत आशुतोषने तब्बल १००० हून अधिक कार्यक्रम सादर केले आहेत. अनेक मोठ्या संगीत कंपन्यांसाठी त्याने पार्श्वगायन केले असून त्यामध्ये झी म्युझिक कंपनी आणि इतर नामांकित संगीत कंपन्यांचा समावेश आहे. विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्याने ६ गाण्यांना आवाज दिला आहे.
आशुतोषचा संगीत जीवनप्रवास…
टेलिव्हिजन क्षेत्रातही आशुतोषने आपली खास छाप उमटवली आहे. झी टॉकीज आणि झी मराठी वरील विशेष चरित्र कार्यक्रमांमध्ये त्याने गायक म्हणून काम केले आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चरित्र, भगवान श्रीकृष्ण चरित्र, श्री गणेश चरित्र आणि छत्रपती संभाजी महाराज चरित्र या कार्यक्रमांचा समावेश आहे. तसेच स्टार प्रवाह वरील सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत त्याने चार मिनिटांचा विशेष केमिओ साकारला. सध्या आशुतोष मॉरिशसमध्ये एका आंतरराष्ट्रीय बँडसोबत कार्यरत असून येत्या काळात दुबई, कॅनडा आणि इतर देशांमध्येही त्याचे कार्यक्रम होणार आहेत. या संपूर्ण प्रवासात त्याची पत्नी ईशा आशुतोष सुरजूसे ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. आई, पत्नी, मैत्रीण अशा अनेक भूमिका निभावत तिने आशुतोषच्या प्रत्येक संघर्षात त्याला साथ दिली. इंडियन आयडल आणि सा रे ग म प यांसारख्या अनेक मोठ्या रिअॅलिटी शोमध्ये अपयश मिळूनही आशुतोष कधीच खचला नाही. तब्बल दहा वर्षांच्या संघर्षानंतर आज तो पुण्यात २०१८ पासून दोन शाखांसह स्वतःची संगीत अकॅडमी यशस्वीरित्या चालवत आहे. संगीताची साधना, कुटुंबाचा पाठिंबा आणि स्वतःवरील विश्वास यांच्या जोरावर आशुतोष सुरजूसे याने उभारलेली ही यशोगाथा आज अनेक तरुण कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.





