रात्रीच्या वेळी कामावर निघालेल्या व्यक्तीला मारहाण करून लुटले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/images-2-7.jpeg)
पिंपरी l प्रतिनिधी
कामावर निघालेल्या व्यक्तीला रस्त्यात अडवून त्याला मारहाण करून लुटले. ही घटना शुक्रवारी (दि. 18) रात्री साडेदहा वाजता कासारवाडी येथे घडली.
वसीम आदम सिंद खेडे (वय 25, रा. कासारवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एजाज शेख उर्फ इज्या (वय 21), आशपाक शेख (वय 20), बसू यमनाप्पा धोत्रे (वय 22, तिघे रा. कासारवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे खाजगी बसवर चालक म्हणून काम करतात. ते शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता तिसऱ्या शिफ्टला कामाला जात होते. कासारवाडी येथील गुलीस्तान नगर येथे आले असता आरोपींनी त्यांना अडवले. ‘काय रे कुठं चालला. तुझ्या खिशात किती पैसे आहेत, ते गोडीत काढून दे’ असा दम आरोपींनी दिला. ‘माझ्याकडे पैसे नाहीत’ असे फिर्यादी यांनी म्हटले असता त्यांना आरोपींनी शिवीगाळ करून खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर खिशातून 1100 रुपये रोख रक्कम काढून घेतली. त्यावेळी त्यांचा 18 हजारांचा मोबाईल फोन पडून गहाळ झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे तपास करीत आहेत.