थेरगावात फायनान्स कंपनीच्या कार्यालयास शॉर्ट सर्किटमुळे आग; एक कोटीचे नुकसान
![A fire broke out at a finance company office in Thergaon due to a short circuit; A loss of one crore](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/thergaon.jpg)
पिंपरी – थेरगाव येथे एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही घटना आज (बुधवारी, दि. 6) सकाळी पावणे दहा वाजता घडली.
थेरगाव येथे छोलामंडल फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयात बुधवारी सकाळी पावणे दहा वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. याबाबत शाखा व्यवस्थापक संजय रघुनाथ पवार यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्राचे दोन, रहाटणी आणि एमआयडीसी हिंजवडी येथील प्रत्येकी एक असे एकूण चार बंब घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमध्ये कार्यालयातील फर्निचर, एसी, कागदपत्रे व इतर साहित्य असे एकूण सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे फायनान्स कंपनीकडून अग्निशमन विभागाला सांगण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.