गीत, शाहिरी आणि प्रबोधनाचा संगम; प्रबोधन पर्वाच्या तिसऱ्या दिवशी रसिकांची भरघोस उपस्थिती

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित “क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वामध्ये तिसऱ्या दिवशी पार पडलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि रसिकांच्या भरघोस उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमांनी प्रेक्षकांच्या मनावर अमीट छाप सोडली.
दिवसाची सुरुवात सुप्रसिद्ध गायिका सपना खरात आणि भगवान शिरसाठ यांच्या गीतगायनाने झाली. त्यांनी सादर केलेली सामाजिक जाणीवेच्या आणि प्रेरणादायी गीतांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकले. त्यानंतर गायक वैभव खुने, भाग्यश्री इंगळे आणि कुमारी नालंदा सांगवीकर यांनी “बुद्ध-भीम गीतांची परिवर्तनवादी मैफिल” सादर करत समाज परिवर्तनाचा बुलंद आवाज मंचावर उमटवला.
दुपारच्या सत्रात मेघानंद जाधव आणि अमोल जाधव यांनी आपल्या शाहिरी जलशाच्या माध्यमातून क्रांती, समता आणि सामाजिक संघर्षाची ज्वलंत गाथा सादर केली. यानंतर धिरज वानखेडे, स्वप्निल पवार, अनिल गायकवाड आणि रोमिओ कांबळे यांच्या सादरीकरणाने सांस्कृतिक कार्यक्रमात नवचैतन्य फुलले.
सायंकाळच्या सत्रात सुप्रसिद्ध गायक आनंद किर्तने यांनी सामाजिक प्रबोधनात्मक गीते सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. त्यानंतर ज्येष्ठ गायिका सुषमादेवी, मैना कोकाटे, आणि साधना मेश्राम यांच्या सादरीकरणाने रसिक श्रोत्यांना भारावून टाकले.
त्यानंतर “मेरा भीम जबरदस्त है” या विशेष कार्यक्रमात ख्यातनाम गुजराती गायक विशन काथड यांनी आपल्या दमदार आवाजात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे संगीत रूपात दर्शन घडवले. त्यांच्या गीतांना प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांची दाद दिली.
दिवसाची सांगता प्रबोधनात्मक गीतगायन कार्यक्रमाने झाली. या कार्यक्रमात साधना सरगम, चंद्रकांत शिंदे, रेश्मा सोनवणे, रवींद्र खोमणे व अन्य कलाकारांनी देशभक्ती, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायावर आधारित गीते सादर केली.
प्रबोधनपर्वाच्या तिसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवड परिसरातील हजारो नागरिकांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या विचारांना कलामाध्यमातून अनुभवण्याचा अनुपम आनंद घेतला. संपूर्ण दिवसभर संगीत, शाहिरी आणि विचारांचा जागर घडवणारा ठरला.