breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

74 वर्षीय महिलेच्या ह्रदयातील 8.6 सें.मी.ची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश

  • डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील शस्त्रक्रिया झाली यशस्वी
  • हृदय, फुफ्फुस आणि रक्तवाहिन्या (सीव्हीटीएस) शस्त्रक्रिया विभागाचे यश

पिंपरी, (महाईन्यूज) – एका 74 वर्षीय महिलेच्या ह्रदयात तयार झालेली 8.6 से.मी.ची गाठ (ट्युमर) शस्त्रक्रिया करून यशस्वीपणे बाहेर काढण्यात पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. हृदय, फुफ्फुस आणि रक्तवाहिन्या (सीव्हीटीएस) शस्त्रक्रिया विभागाच्या टीमने ही यशस्वी कामगिरी केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.

शस्त्रक्रियेच्या दोन दिवस आधी ७४ वर्षीय महिलेला अचानक दम लागत होता. श्वास घेताना त्रास होऊ लागल्यामुळे रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले. सर्व तपासण्या करण्यात आल्या. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये पाणी भरले होते. हृदयामधील असणाऱ्या चार कप्प्यांमधील एका कप्प्यात गाठ (ट्युमर) असल्याचे दिसून आले. तसेच, हृदयाची एक झडप कार्यकरत नव्हती.  हृदयामधील गाठ आणि बंद पडलेली हृदयाची झडप, फुफ्फुसांमधील पाणी यामुळे रुग्णाचा जीव जाण्याचा धोका अधिक होता.

रुग्णालयाच्या डॉक्टर्स टीमने तातडीने मेरॉथॉन सर्जरी केली. यामध्ये (Heart lung Machine) हृदयाचे कार्य चालविणाऱ्या मशीनवर रुग्ण ठेऊन पूर्णपणे हृदय बंद करून हृदयवर शस्त्रक्रिया केली. त्यानंतर 8.6 सें.मी.ची गाठ बाहेर काढण्यात आली. त्यासोबतच हृदयाची बंद पडलेली झडप पुन्हा कार्यरत करण्यात डॉक्टरांना यश आले. शस्त्रक्रिया पूर्ण होण्यास ६ तासांचा अवधी लागला. शस्त्रक्रियेनंतर दोन तासांनी रुग्णाला जीवनरक्षक प्रणाली व्हेंटिलेटर वरून बाहेर काढले. रुग्ण महिलेची ताब्येत स्थिर आहे. त्यांच्यावर योग्य औषधोपचार सुरु आहेत, अशी माहिती डॉक्टरांनी कळविली आहे.

शस्त्रक्रिया पार पाडण्यात विभागप्रमुख डॉ. अनुराग गर्ग, डॉ. आशिष डोळस, डॉ. स्मृती हिंदारिया, डॉ. रणजित पवार, भूल तज्ञ्  डॉ. विपुल शर्मा, डॉ. संदीप जुनघरे यांचा सहभाग होता. तसेच, रुग्ण महिलेवर केलेली शस्त्रक्रिया व उपचार हे महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत केले आहेत. याअगोदर दोन महिन्यापूर्वी सहा महिन्याच्या बाळावर अश्याच प्रकारची शस्त्रक्रिया केली होती. त्यावेळी २.५ सें.मी.ची गाठ काढली होती, अशी माहिती  विभाग प्रमुख डॉ अनुराग गर्ग यांनी दिली. या यशस्वी कामगिरीबद्दल डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या टीमचे कुलपती डॉ. पी. डी पाटील व उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी कौतुक केले आहे.

  • या विभागाने आतापर्यंत ४०० हुन अधिक हृदय संदर्भातील शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यापैकी ९० टक्के शस्त्रक्रिया मोफत केल्या आहेत. यामध्ये २३ दिवसांच्या बाळापासून ते ८७ वर्षीय वृद्ध रुग्णांचा समावेश आहे.
  • डॉ. अनुराग गर्ग, विभागप्रमुख, सीव्हीटीएस
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button