वाघोली येथे ६८ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा : पिंपरी-चिंचवडची लाल माती आखाड्यात!
पिंपरी-चिंचवडच्या परंपरेचा, संस्कारांचा, मेहनतीचा अन् पैलवानांच्या घामाचा सन्मान

पिंपरी-चिंचवड | महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरात एक अभिमानास्पद आणि ऐतिहासिक उपक्रम पार पडला. वाघोली येथे आयोजित ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवडमधील विविध तालमींतील पवित्र लाल माती एकत्र करून ती स्पर्धेच्या आखाड्यात अर्पण करण्याचा मान शहराला लाभला आहे.
चिंचवड येथील गांधी पेठ तालीम येथे पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने शहरातील सुमारे २९ ते ३० गावांतील तालमींमधून मुठभर पवित्र माती संकलित करण्यात आली. ही माती एका कलशात एकत्र करून कुस्ती परंपरेची एकता, आखाड्यांचा सन्मान आणि पैलवानांच्या परिश्रमांचे प्रतीक म्हणून जतन करण्यात आली.

हेही वाचा : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी पवनाथडी जत्रा प्रभावी व्यासपीठ!
सोमवार, दि. ०२ मार्च २०२६ रोजी वाघोली येथे माती पूजन करून ही लाल माती महाराष्ट्र केसरीच्या मुख्य आखाड्यात मिसळण्यात येणार असून स्पर्धेदरम्यान त्याच मातीचा वापर केला जाणार आहे. पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत भाऊ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमावेळी मा. नगरसेवक राजू गोलांडे, भारत केसरी विजय गावडे, शशिकांत घुले आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
स्थानिक पैलवानांच्या संस्काराचा सन्मान
“ही केवळ माती नसून पिंपरी चिंचवडच्या परंपरेचा, संस्कारांचा, मेहनतीचा आणि पैलवानांच्या घामाचा सन्मान आहे.” या उपक्रमामुळे शहरातील कुस्ती परंपरेबद्दलचा अभिमान अधिक दृढ झाला असून ग्रामस्थ, वस्ताद, पैलवान आणि कुस्तीप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यक्रमास पिंपरी चिंचवडमधील सर्व ग्रामस्थ, वस्ताद, पैलवान, कुस्तीप्रेमी तसेच पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघ व गांधी पेठ तालीम यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. सूत्रसंचालन संतोष माचुत्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौरभ कामथे यांनी केले.




