पीएमपीएमएल बस प्रवासादरम्यान 65 हजारांचा ऐवज चोरीला
पिंपरी l प्रतिनिधी
मारुती मंदिर चौक ते तळेगाव स्टेशन चौक या दरम्यान पीएमपीएमएल बसने प्रवास करत असलेल्या महिलेचा 65 हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 28) दुपारी घडली.
स्वाती भीमा वाळूंज (वय 30, रा. कुरुज, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या शनिवारी दुपारी साडेतीन ते पावणे चार वाजताच्या कालावधीत पीएमपीएमएल बसने मारुती मंदिर चौक ते स्टेशन चौक तळेगाव दाभाडे येथे प्रवास करत होत्या. बस प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या पर्समधून 60 हजारांचे सोन्याचे मिनी गंठन, पाच हजार रोख रक्कम आणि कागदपत्रे असा एकूण 65 हजारांचा ऐवज चोरून नेला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.