Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागेश्वर महाराजांच्या मानाच्या विड्यास २५ लाख!

मोशीतील श्री. नागेश्वर महाराज यात्रा उत्सव उत्साहात संपन्न

महाईन्यूज | पिंपरी-चिंचवड 

मोशी येथील जागृत देवस्थान नागेश्वर महाराज मंदिर येथे सुरू असलेल्या नागेश्वर महाराज यात्रा व भंडारा उत्सवानिमित्त पारंपरिक लिलाव सोहळा मंगळवारी भक्तिभावाच्या वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी श्री नागेश्वर महाराजांच्या मानाच्या विड्यास तब्बल २५ लाख रुपयांची बोली लागली. अकरा लाखांपासून सुरू झालेली बोली बारा, पंधरा, अठरा लाख असा टप्पा पार करत अखेर पंचवीस लाखांवर जाऊन थांबली. तिसरा व अंतिम पुकारा होताच मंदिर परिसरात टाळ्यांचा गजर झाला. मानाचा विडा मिळविणारे भाविक विजय पांडुरंग सस्ते यांनी नागेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आपली श्रद्धा व्यक्त केली.

महाशिवरात्रीपासून सुरू झालेल्या या वार्षिक उत्सवात मंगळवारी सकाळी अकरा वाजता नागेश्वर महाराज मंदिर सभागृहात परंपरेनुसार लिलावास सुरुवात झाली. उत्सवकाळात महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या वस्तू, भंडाऱ्यातील प्रसाद व अन्य धार्मिक साहित्याचा लिलाव मोठ्या श्रद्धेने करण्यात आला. मोशीकरांची नागेश्वर महाराजांवरील अतूट श्रद्धा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

हेही वाचा      :            राज्यात आता निळ्या अन्‌ लाल पूररेषांचे होणार पुन:सर्वेक्षण!

मानाची ओटी आकाश विष्णू सस्ते यांनी १५ लाख ११ हजार १०१ रुपये इतक्या मोठ्या रकमेची बोली लावून मिळवली. तर मानाचे शेवटचे फळ स्वप्नील सासवडे यांनी ११ लाख १ हजार ५ रुपये देऊन घेतले. मानाचा पहिला लिलाव योगेश गुलाब बोराटे यांनी २ लाख ५१ हजार रुपये इतक्या बोलीत जिंकला. यावर्षी लिलाव करण्याचा मान केदारी कुटुंबाला देण्यात आला होता. त्यांनी लिलावाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही या लिलावासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. “देवाच्या दारात पैशाला मोल नसते” याचा प्रत्यय देणारा हा सोहळा सुरुवातीपासून शेवटपर्यंत भक्तिरसाने भारलेला होता. लिलावामध्ये सोन्या-चांदीच्या वस्तू, भंडाऱ्यातील प्रसाद तसेच उत्सवासाठी वापरण्यात आलेल्या विविध वस्तूंचा समावेश होता. परंपरेनुसार ग्रामस्थांच्या वतीने भंडाऱ्याचा महाप्रसाद बनविण्यासाठी लागणारी भांडी दरवर्षी नव्याने खरेदी केली जातात.

मोशीकरांच्या श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचा संगम असलेला नागेश्वर महाराज यात्रा व लिलाव उत्सव यंदाही जल्लोषात पार पडला. धार्मिक विधी, भक्तिभाव आणि लाखोंच्या बोलीतून व्यक्त होणारी श्रद्धा यामुळे हा उत्सव भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button