पिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात चोरीच्या 11 चो-या : 20 लाखांचा मुद्देमाल चोरीला

पिंपरी l प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरात चोरट्यांचा सुळसुळाट सुटला आहे. चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश येत आहे. शनिवारी (दि. 29) पिंपरी चिंचवड मधील सात पोलीस ठाण्यात चोरीचे 11 गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये चोरट्यांनी तब्बल 20 लाख 65 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

पिंपरी आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. पिंपरी पोलीस ठाण्यात दिलीप मच्छिन्द्र थोरात (वय 43, रा. पिंपरी) यांनी फिर्याद दिली. हेमंत मनोज लखन (वय 24), राहुल मनोज लखन (वय 21, दोघे रा. सॅनेटरी चाळ, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्या टेम्पोच्या काचा फोडून 1200 रुपयांचे नुकसान केले. तर फिर्यादी यांच्याकडून 1100 रुपये जबरदस्तीने चोरून नेले.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात एका महिलेने अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिला मोशी-देहूरोड रस्त्याने पायी चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील 25 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून चोरून नेले.

चाकण आणि सांगवी पोलीस ठाण्यात घरफोडीचे दोन गुन्हे दाखल आहेत. क्रिस्तोपॉल मॅचेरी (वय 28, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून चाकण येथील साऊथ इंडियन बँक फोडून अज्ञात चोरट्याने स्ट्रॉंग रूमचा लॉकर आणि एटीएम मशीन फोडायचा प्रयत्न केला. तसेच एक डिजिटल व्हिडीओ रेकॉर्ड मशीन व एक नेटवर्क पॅनल सेट असा एकूण 30 हजार रुपयांचा माल चोरून नेला.

रोहित राजन अग्रवाल (वय 32, रा. पिंपळ सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा फ्लॅट बनावट चावीच्या साहाय्याने उघडून अज्ञात चोरट्याने घरातून एक लाख 94 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.

चिंचवड आणि वाकड मधून दोन दुचाकी चोरीला गेल्या. रोहित रामचंद्र देसाई (वय 27, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. देसाई यांच्या सोसायटीच्या पार्किंग मधून चोरट्यांनी त्यांची 50 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली.

नियामतअली महमदइनुस शेख (वय 48, रा. ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शेख यांची 30 हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी डांगे चौक, उड्डाणपुलाच्या खालून चोरून नेली आहे.

नाणेकरवाडी चाकण येथे एका घराच्या उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरट्याने 15 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. नमीदरकुमार जयभगवान दहिया (वय 24, रा. नाणेकरवाडी, तळेगाव रोड, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चापेकर चौक, चिंचवड येथील सुनीती ज्वेलर्स हे दुकान फोडून चोरट्यांनी तब्बल 330 ग्रॅम वजनाचे 16 लाख 31 हजार 500 रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी लखमीचंद झुंबरलाल कटारिया (वय 42, रा. थेरगाव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुकानातील कामगार संजू तापस सिंघा (वय 24, रा. पश्चिम बंगाल) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंपनीतील साहित्य चोरून नेल्या प्रकरणी एका कामगाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम रवींद्र साळवे (वय 25, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. अनिल विठ्ठल उभे (वय 48, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

धावडेवस्ती भोसरी येथे एका इको गाडीचा 10 हजार रुपये किमतीचा सायलेन्सर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी बालाजी शिवाजी माने (वय 42, रा. धावडेवस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपळे गुरव येथील सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केलेल्या चार कारमधील इलेक्ट्रिकल साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. याप्रकरणी महेंद्र सुभाष गुंड (वय 29, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button