1 जानेवारी 2016 नंतरची अवैध बांधकामे पाडणार, अडथळा केल्यास नगरसेवकांवर कारवाई – आयुक्त श्रावण हर्डिकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/201707071642412682_news-in-marathi-notice-to-Commissioner-about-RTI-center_SECVPF.jpg)
निवडणुका संपताच आयुक्तांनी काढले फर्मान, बांधकाम विभागाला सक्त सुचना
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका संपताच पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा पडणार आहे. निवडणुक काळात बांधलेल्या सर्व अनधिकृत बांधकामावर देखील कारवाई होणार आहे. 1 जानेवारी 2016 नंतर शहरातील अवैध बांधलेल्या सर्व बांधकामे जमिनदोस्त करण्यात येणार आहेत. तसेच कारवाईला पदाधिका-यांनी अडथळा आणल्यास त्यांच्यावर नियमानूसार कारवाई करा, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट झाला आहे. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शहरातील अनेक भागात नागरिकांना अवैध बांधकामे बांधली आहेत. काहींनी वाढीव बांधकामे केलेली आहेत. निवडणुक कालावधीत अधिकारी वर्ग कामात व्यस्त असतात. मात्र, त्यावेळी बांधकामे सर्वाधिक झालेली आहेत.
निवडणुक कालावधीत झालेल्या सर्व बांधकामाना नोटीस देण्यात येईल. जर नोटीस दिल्या नसतील त्याच्या घरांवर चिटकवण्यात येतील. निवडणुकीच्या कालावधीत घाईघाईने बांधकामे बांधलेली आहेत. त्यामुळे 1 जानेवारी 2016 नंतर शहरातील सर्व बांधकामे पाडण्यात येतील. त्यासाठी पोलिसाची सर्वतोपरी मदत घेण्यात येईल.
शहरातील अनधिकृत बांधकामामुळे महापालिकेवर सोयी-सुविधाचा ताण येत आहे. अवैध बांधकामे बांधून ती भाडे करारने देवून नागरिक पैसे कमवित आहेत. पण, महापालिकेचे पाणी अतिरिक्त वापरले जात असून शहरवासियांना पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात सर्व बांधकामे पाडण्यासाठी योग्य ते नियोजन केले जाईल. पोलिसाचा अतिरिक्त फाैजफाटा घेवून बांधकामे पाडण्यात येणार आहेत. या कारवाईत बीट निरीक्षक, कनिष्ठ व उपअभियंता यांनी जबाबदारी व्यवस्थित न पाळल्यास त्याच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असेही आयुक्त हर्डिकर यांनी म्हटले आहे.