breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘हृदय संगीत’मधून श्रोत्यांना मिळाली शांतरसाची अनुभूती

उदंड प्रतिसादाने पंडित हृदयनाथ मंगेशकरही भारावले

पुणे | प्रतिनिधी

 ‘गगन सदन तेजोमय’, ‘नदीला पूर आलेला’, ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’, ‘भय इथले संपत नाही’, ‘केंव्हा तरी पहाटे’ ‘लग जा गले’, ‘माझे राणी माझे मोगा’, ‘आयेगा आनेवाला’ या आणि अशा सदाबहार गीतांनी सजलेल्या ‘हृदय संगीत’मधून श्रोत्यांना शांतरसाची अनुभूती मिळाली. तब्बल वर्षभरानंतर झालेल्या या कार्यक्रमातून हृदयस्पर्शी भाव पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या मैफलीतुन रसिकांनी अनुभवले. ‘लॉकडाऊन’नंतर झालेल्या या पहिल्याच कार्यक्रमात प्रेक्षागृह ‘हाऊसफुल’ झाल्याचे पाहून खुद्द पंडित हृदयनाथ मंगेशकरही भारावले आणि त्यांनी रसिकांना टाळ्या वाजवून अभिवादन केले. 

निमित्त होते, पृथ्वीराज थिएटर्स आयोजित, मनिषा निश्चल्स महक निर्मित व प्रस्तुत ‘हृदय संगीत’ या विशेष कार्यक्रमाचे. पिंपरी-चिंचवडच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या या कार्यक्रमात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासह डॉ. राधा मंगेशकर, मनीषा निश्चल आणि वंडरबॉय पृथ्वीराज यांच्या सुरेल गीतांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. ‘गगन सदन तेजोमय’ या गीताने कार्यक्रमाची सुरवात करत पंडितजींनी कोरोनाचा अंधःकार संपून नवी पहाट होत असल्याचा भाव प्रकट केला. प्रत्येक गाण्याचा प्रवास, त्यामागच्या आठवणी सांगताना पंडितजींनी रसिकांच्या हृदयाला साद घातली. वंडरबॉय पृथ्वीराजच्या ‘नको देवराया अंत आता पाहू’ आणि ‘जिवा-शिवाची बैलजोड’ या गीतांनी रसिकांची मने जिंकली.

या वेळी हृदयनाथ मंगेशकर म्हणाले की, गेले काही महिने सगळेच घरात बसून होते. हळूहळू परिस्थिती पूर्ववत होत असताना रसिक कार्यक्रमाला येतील का?, अशी शंका होती. परंतु तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात. मी आपले आभार मानतो. इतके दिवस गायक, वादक सगळेच कलाकार घरात बसून होते. तुमच्या या उदंड प्रतिसादामुळे आम्हा सगळ्यांनाच नवसंजीवनी मिळेल. जवळपास वर्षभरानंतर मी आज हार्मोनियम घेऊन रंगमंचावर बसलोय, गाता येईल की नाही याची शंका वाटते. तुमच्या प्रोत्साहनामुळे आम्हाला ऊर्जा मिळाली आहे. आपल्या सर्वांसाठी आजचा दिवस म्हणजे ‘आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनु’ असाच आहे.”

संगीत संयोजन विवेक परांजपे यांनी केले. पंडित रमाकांत परांजपे (व्हायोलिन), केदार परांजपे (सिंथेसायजर), डॉ. राजेंद्र दूरकर आणि विशाल गंड्रतवार (तबला व ढोलक), अजय अत्रे (ऑक्टोपॅड मशीन), डॉ. विशाल थेलकर (गिटार), शैलेश देशपांडे (बासरी) यांनी वाद्यांवर साथसंगत केली. ध्वनि व्यवस्था बबलू रमझानी, तर प्रकाश व मंच व्यवस्था राणे ब्रदर्स यांनी केली. मनीषा निश्चल यांनी गायलेल्या ‘भय इथले संपत नाही’ आणि राधा मंगेशकर यांनी गायलेल्या ‘एक प्यार का नगमा है’ला रसिकांनी ‘वन्स मोअर’ मागत दाद दिली. राधा आणि मनीषा यांच्या सुरेल गायनाने कार्यक्रम टिपेला गेला. चार वर्षांपूर्वी पुण्यात स्थायिक मनीषा यांच्या स्वरांची जादुई महक रसिकांना भावत असून, सांस्कृतिक, तसेच उद्योगनगरीत विविध स्वरपीठांवर गायन करण्याची संधी मिळत आहे. रसिकांच्या या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून उच्च निर्मिती मूल्य असलेला ‘हृदय संगीत’ कार्यक्रम महाराष्ट्रात सर्वदूर घेऊन जाण्याचा मानस मनीषा निश्चल यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button