#हिवाळीअधिवेशन: भामा आसखेड प्रकल्पासाठीचा पुनर्स्थापना खर्च माफ करा : आमदार लांडगे
![प्लॅस्टिक कारवाईबाबत व्यापाऱ्यांना विश्वासात घ्या: आमदार महेश लांडगे](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Mahesh-Kisan-Landge.jpg)
राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना मागणीचे निवेदन
पिंपरी | प्रतिनधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भामा आसखेड प्रकल्पाअंतर्गत सिंचन पुनर्स्थापना खर्च माफ करा, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. त्याबाबत आमदार लांडगे यांनी मंत्री पाटील यांना निवेदन दिले आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेमार्फत शहराच्या चिखली, च-होली, वडमुखवाडी, दिघी आणि मोशी परिसरात पाणीपुरवठा होण्यासाठी नियोजित भामा आसखेड प्रकल्प राबविण्याची प्रक्रीया सुरू आहे. शहराचा लोकसंख्यावाढीचा वेग आणि भविष्यातील सन 2045 पर्यंतची लोकसंख्या विचारात घेऊन महापालिकेकडून सरकारला आंद्रा व भामा आसखेड धरणातून पाणी आरक्षित करण्यासाठी मागणी करण्यात आली होती.
पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवडसाठीही निर्णय घ्या…
भामा आसखेड प्रकल्पग्रस्था साठीचा पुणे महानगरपालिकेने केलेल्या पुनर्वसन खर्च वजा जाता उर्वरित खर्च सिंचन पुनर्स्थापनेचा खर्च म्हणून पुणे महानगरपालिकेकडून आकारण्यात यावा, असा शासन निर्णय झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने २७ ऑगस्ट २०२० रोजी हा ठराव पारित केला आहे. त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी शासन निर्णय होणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भामा आसखेड प्रकल्पाअंतर्गत सिंचन पुनर्स्थापना खर्च माफ करण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे प्रस्तावित आहे. तरी त्वरित तो मजूर करावा, अशी मागणी या वेळी आमदार लांडगे यांनी केला.