हाथरस प्रकरण, गुन्हेगारांना फाशी द्या; पिंपरीत कॅंडल मार्चद्वारे पीडित तरुणीला श्रद्धांजली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/2WhatsApp_20Image_202020_10_02_20at_202.38.46_20PM.jpeg)
पिंपरी |महाईन्यूज|
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील पीडित तरुणीला श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील वाल्मीकी समाजातर्फे ‘कॅंडल मार्च’ काढण्यात आला. पिंपरी कॅम्पातून मार्चला सुरुवात झाली. पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे समारोप झाला. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. पीडित युवतीचा फोटो हातात घेऊन गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी महिलांनी केली.
महाराष्ट्र प्रदेश वाल्मीकी समाज अध्यक्ष मोहन बिडलान आणि पिंपरी-चिंचवड शहर वाल्मीकी समाज अध्यक्ष राजू परदेशी यांनी कॅंडल मार्चचे नेतृत्व केले. माजी नगरसेवक अरुण टाक, राजेश बडगुजर, सोमनाथ वेद, अनिल पारचा, नरेंद्र टाक, आशा सोदाई, प्रियंका टाक, विजेंद्री वेद, किरण वेद, रवी ढकोलिया, कुणाल वेद आदी सहभागी झाले होते.
कॅंडल मार्चचा समारोप झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णा प्रकाश यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, की शहरासह देशातील सर्व सुरक्षारक्षक, रखवालदार, भाडेकरूंची नोंद पोलिसांकडे असायला हवी. त्यांना कामावर ठेवताना पोलिसांकडून पडताळणी व्हायला हवी. त्यांचे नाव, गाव, कागदपत्रे नियमितपणे तपासायला हवीत.” अशीही मागणी यावेळी करण्यात आली.