स्व. सीताबाई लांडे प्रतिष्ठानच्या वतीने जीवनावश्यक वस्तुंच्या किटचे मोफत वाटप
पिंपरी| महाईन्यूज| प्रतिनिधी
– नगरसेवक शाम लांडे यांच्या वतीने कासारवाडीत ‘एक हात मदतीचा’ उपक्रम
कोरोनामुळे मागील बारा दिवसांपासून देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरीभागातील हजारो कुटुंबियांची आर्थिक अडचण झाली आहे. अशा गरीब कुटुंबांना, शहरात भाड्याने राहणा-या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अन्नाची टंचाई भासत आहे. अशा गरजू, गरीब, कुटुंबांना व विद्यार्थ्यांना सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मदत करण्याच्या उद्देशाने कासारवाडीतील स्व. सीताबाई लांडे प्रतिष्ठान आणि नगरसेवक शाम लांडे मित्रपरिवारच्या वतीने ‘एक हात मदतीचा’ या संकल्पनेतून अन्नधान्य, किराणा व सॅनिटायझर किटचे मोफत वाटप करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते शाम लांडे यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमात कासारवाडी परिसरातील सुमारे दीड हजार कुटुंबांना या किटचे मोफत वाटप सोमवारपासून (दि.6) सुरु करण्यात आले. यावेळी शाम लांडे, भोसरी मंडलाधिकारी जयश्री महेश कवडे, भोसरी गाव कामगार तलाठी अश्विनी होडगे, जैन समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक पगारीया, शांतीलाल ओसवाल, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सयाजी लांडे, रमेशबापू लांडगे, राजेंद्र शेळके, विजय गाढवे, नितीन आगरवाल आदींच्या उपस्थित होते.
सोमवारी सकाळी नाशिक फाटा ते सिद्धार्थ पेट्रोलपंप परिसरातील मस्जिद परिसर, दत्तू पठारे चाळ, नवजीवन मंडळ परिसर, कासारवाडी मनपा शाळेसमोरील चाळ परिसर, विष्णू लांडे चाळ या भागात प्राधान्याने वाटप करण्यात आले. उर्वरीत भागात मंगळवार व बुधवारी या किटचे वाटप करण्यात येणार आहे. या किटमध्ये तांदूळ, साखर, चहा पावडर, तेल, तूरडाळ, मसूरडाळ, हरभरा, मीठ, हळद, कांदा मसाला, लाल तिखट, पोहे, मटकी, सोयाबीन, चवळी, वटाणा, गव्हाचे पीठ, डेटॉल साबण, सॅनिटायझर व कोरोनाविषाणू प्रतिबंधक खबरदारी व त्याबाबत घ्यावयाची काळजी या विषयी माहिती देणारे पत्रक देण्यात आले. तसेच नगरसेवक शाम लांडे, मंडलाधिकारी कवडे व तलाठी होडगे यांनी नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले आणि पोलिस आणि प्रशासनाला सहकार्य करावे असेही आवाहन केले.