स्वाईन फ्लूवरुन आरोग्य वैद्यकीय अधिका-यांची खरडपट्टी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/1-1-1.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – शहरात स्वाइन फ्लूच्या आजाराने थैमान घातले आहे. आतापर्यंत शहरातील तब्बल 20 लोकांचा मृत्यू या आजाराने झाला आहे. तरीही पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने आवश्यक ती खरबदारी व उपाययोजना न केल्याने भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी आरोग्य वैद्यकीय अधिका-याची चांगलीच खरडपट्टी काढली. संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांनी काम न केल्यास विभागप्रमुखास जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
‘ग’ क्षेत्रीय समितीचे अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन यांच्या मागणीनुसार विविध समस्या व प्रश्नांबाबत अधिकार्यांची बैठक शुक्रवारी (दि. 14) थेरगाव येथील ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात झाली. क्षेत्रीय समितीस्तरावर तेथील समस्या व प्रश्नांचा निपटारा व्हावा म्हणून सत्ताधारी भाजपतर्फे या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या तब्बल 3 तास चाललेल्या बैठकीस पालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते. महापौर राहुल जाधव, आ. जगताप, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, पालिकेचे सर्व विभागप्रमुख, अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे, पोलिस ठाणे व वाहतुक विभागाचे पोलिस निरीक्षक आदी उपस्थित होते.
शहरात स्वाइन फ्लू आजाराचा संसर्ग वाढला आहे. त्यावर पुणे शहराच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड पालिकेने काय उपाययोजना केल्या आहेत, असा प्रश्न आ. जगताप यांनी उपस्थित केला. स्वाइन फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या. ‘वायसीएम’ रूग्णालयातील ओपीडीत दररोज सुमारे हजार रूग्ण का येतात. हा ताण कमी करण्यासाठी पालिकेचे इतर दवाखान्यात सुविधा का दिल्या जात नाहीत. त्याकडे दुर्लक्ष का होते, असे प्रश्न उपस्थित करीत, त्या संदर्भात तातडीने दक्षता घेण्याचा सूचना त्यांनी दिल्या. अधिकारी व कर्मचारी काम करीत नसल्यास संबंधित विभागप्रमुखांवर कारवाई केली जाईल, असा इशारा ही त्यांनी दिला. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील स्थापत्यविषयक कामे तातडीने मार्गी लावण्याचे सूचना जगताप यांनी अधिकार्यांना केल्या.
हातगाडी व पथारी वाल्याचे ‘हॉकर्स झोन’मध्ये पुनवर्सन करावे. विनापरवाना विक्रेत्यांवर कारवाई करून पदपथ व रस्ते मोकळे करावेत. वाहतुक नियमनासाठी वाहतुक पोलिसांनी दररोज हजर राहावे. खासगी ट्रॅव्हल्स बसगाड्यावर कारवाई करावी. त्यांना अंतर्गत रस्त्यातून बंदी करावी, आदी सूचना वाहतूक पोलिसांना देण्यात आल्या.