स्वाईन फ्लूने दोन रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
पिंपरी ( महा ई न्यूज )- शहरात स्वाईन फ्लूचा कहर सुरूच आहे. आज दोन रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. ‘स्वाईन फ्लू’मुळे वाल्हेकरवाडी येथील ३२ वर्षीय तरूणाचा तर अजमेरा कॉलनी येथील ५२ वर्षीय पुरूषाचा आज (सोमवार) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गेल्या २० दिवसांतला ‘स्वाईन फ्लू’चा १० वा बळी असून जानेवारीपासून ११ रूग्ण या भयानक आजाराने मृत पावले आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वाल्हेकरवाडी येथील ३२ वर्षीय तरूणाला दि.३१ ऑगस्ट रोजी चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर अजमेरा येथील ५२ वर्षीय पुरूषाला २४ ऑगस्ट रोजी पिंपरी येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर या दोघांनाही अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांत त्यांची प्रकृती खालावली. अखेर उपचारा दरम्यान आज या दोन्ही रूग्णांचा मृत्यू झाला असून जानेवारीपासून बळींची संख्या ११ वर पोहचली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूने आपला विळखा चांगलाच आवळला आहे. हवामानात होत असलेल्या बदलामुळे स्वाईन फ्लूचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.