स्वरसागर संगीत महोत्सवातील कलाकारांच्या मानधनाला ‘जीएसटी’ची सुट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/5bd7735259e81545183724c55adebcd1.jpg)
तीन तासांच्या कार्यक्रमासाठी लाखो रुपयाची सुपारी
पिंपरी – महापालिकेच्या 19 व्या स्वरसागर संगीत महोत्सवात लाखो रुपये खर्च करुन कलाकारांना आमंत्रित करण्यात आले. त्या कलाकारांनी तीन तासांच्या कार्यक्रमासाठी लाखो रुपये मानधन म्हणून स्विकारले. परंतू, महापालिकेच्या लेखा विभागाने काही कलाकारांच्या मानधन बिलांना जीएसटी न लावताच त्या कलाकारांची बिले अदा केल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे.
महापालिकेतर्फे आयोजित केलेला स्वरसागर संगीत महोत्सव चिंचवडच्या पूर्णानगर येथील मैदानात घेण्यात आला. हा महोत्सव 1 ते 4 फेब्रुवारी चार दिवस घेण्यात आला. या महोत्सवात नंदेश उमप यांचा ‘लोकरंग’, डॉ. सलील कुलकर्णी व संदीप खरे यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’, गायक महेश काळे यांच्या ‘शास्त्रीय गायन’, कलावती आर्ट यांचा ‘तालयात्रा’, राकेश चाैरसिया यांचा ‘बासरी वादन’, पुरबायन चटर्जी, अनुब्रता चटर्जी यांचा ‘सतार वादन’ या कार्यक्रमास रसिकांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही.
या महोत्सवात लोकरंग कार्यक्रमास 2 लाख 25 हजार रुपये, आयुष्यावर बोलू काही कार्यक्रमास 2 लाख रुपये, तालयात्रा कार्यक्रमास 4 लाख 13 हजार रुपये, सतार वादन कार्यक्रमास 3 लाख रुपये, शास्त्रीय गायन कार्यक्रमास 5 लाख 15 हजार रुपये, भरतनाट्यम कार्यक्रमास 48 हजार रुपये एवढे मानधन त्या-त्या कलाकारांने महापालिकेकडून स्विकारले आहे. परंतू, त्या कलाकारांना महापालिकेकडून चेक देताना त्यांच्या मानधनाला ‘जीएसटी’ची रक्कमेतून सुट देण्यात आलेली आहे. मात्र, शास्त्रीय गायन कार्यक्रमासाठी एन.आर.टॅलेंट अॅन्ड इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला 8 लाख 85 हजार रुपये आणि बासरी वादन कार्यक्रमास 2 लाख 65 हजार 500 रुपये जीएसटी लावण्यात आलेला आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग परचंडराव यांनी तक्रार करुन कलाकारांच्या बिलातून जीएसटी वगळून त्यांना मानधनाचे चेक कसे दिले ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
दरम्यान, एकंदरित सत्ताधारी भाजपने बचतीचा मार्ग स्विकारला असताना स्वरसागर महोत्सवावर सुमारे 30 लाख 51 हजार 500 रुपयांचा एवढा खर्च करण्यात आला आहे. तसेच पवनाथडी कार्यक्रमात बचतीची भाषा स्वरसागर महोत्सवाच्या वेळी गायब होवून सढळ हाताने कलाकारांना मानधन बहाल केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा स्वरसागर महोत्सवाचा खर्च जास्त झाल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे.