स्पाइन रस्ताबाधितांना मिळाला भूखंड; आमदार लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/2Pimpri_PCNTDA_F.jpg)
पिंपरी – स्पाइन रस्त्यामुळे बाधित झालेल्या झालेल्या 78 नागरिकांना पहिल्या टप्यात जागा मिळाली आहे. त्यांना प्राधिकरणाने मंजूर केलेल्या पेठ क्रमांक 11 मध्ये 1250 स्केअर फुटाने प्लॉटचे वाटप करण्यात आले. आमदार महेश लांडगे यांच्या गेल्या चार वर्षांपासूनच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
कृष्णानगर येथील क्रीडा संकुलात आज सोमवारी (दि. 27) ‘ड्रॉ़’ काढून भुखंड सोडत करण्यात आली. यावेळी महापौर राहुल जाधव यांच्यासह बाधित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे-नाशिक आणि पुणे-मुंबई महामार्ग जोडण्यासाठी नवनगर विकास प्राधिकरणाने स्पाइन रस्ता उभारला आहे. त्यामुळे त्रिवेणीनगर येथील नागरिकांच्या मिळकती बाधित झाल्या आहेत. त्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी गेल्या चार ते पाच वर्षांपासून आमदार महेश लांडगे हे पाठपुरावा करत आहेत. महापालिकेने या जागेसाठी प्राधिकरणाकडे 16 कोटी 52 लाख रुपये अगोदरच भरले आहेत.
स्पाईन रस्त्यामध्ये 78 नागरिकांची 52 ते 60 मीटर जागा बाधित झाली होती. तर, 128 मिळकत धारकांची 75 मीटर जागा बाधित झाली आहे. या नागरिकांना मोबदला देण्यासाठी तत्कालीन नगरसेवक सुरेश म्हेत्रे, अरुणा भालेकर यांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आमदार महेश लांडगे यांनी पालिका, प्राधिकरणाकडे त्याचा पाठपुरावा सुरु केला होता. प्राधिकरणाने बाधितांच्या पुनर्वसनासाठी सेक्टर दोनमध्ये प्लॉट आरक्षित केला होता. प्राधिकरणाने 500, 750 आणि 1 हजार स्केअर फुटाने बाधित नागरिकांना जागा देण्याची तयारी दर्शविली होती. त्याला आमदार महेश लांडगे यांनी आक्षेप घेतला होता. एवढ्या जागेत घर बांधणे शक्य आहे का? असा सवाल उपस्थित केला होता. त्यांनी प्रत्येक बाधिताला 1250 स्केअर फुट जागा देण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यानंतर प्राधिकरणाने सेक्टर नंबर 11 मध्ये 1250 स्केवर फुटानुसार प्लॉट मंजूर केला होता. त्यामुळे तळवडे, त्रिवेणीनगर मधील बाधितांना भुखंडाचे वाटप करण्याचे निर्देश आमदार लांडगे यांनी अधिका-यांना 13 ऑगस्ट 2018 रोजी दिले होते. त्यानुसार 52 ते 60 मीटर जागा बाधित झालेल्या 78 नागरिकांना आज ‘ड्रा’ काढून भुखंडाचे वाटप करण्यात आले. या नागरिकांना दोन ते तीन महिन्यात भुखंडाचा ताबा मिळणार आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून सुरु असलेल्या आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. तसेच उर्वरित बाधित नागरिकांना देखील लवकरच भुखंडाचे वाटप केले जाणार आहे.
आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘स्पाइन रस्त्यामुळे त्रिवेनीनगरमधील अनेक मिळकत धारक बाधित झाले होते. 78 जणांची 50 ते 60 मीटर तर 128 मिळकत धारकांची 75 मीटर मिळकत बाधित झाली होती. या नागरिकांना भूखंड मिळण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून पाठपुरावा करत होतो. प्राधिकरणाने प्रथम 500, 750 आणि 1 हजार स्केअर फुटाने जागा देण्याची तयारी दर्शविली होती. परंतु, एवढ्या जागेत घर बांधणे शक्य नव्हते. त्यामुळे 1250 स्केअर फुटाने जागा देण्यासाठी पाठपुरावा केला. त्याला यश आले असून आज 78 बाधितांना जागा मिळाली आहे. उर्वरित बाधित नागरिकांना लवकरच भूखंडाचे वाटप केले जाईल. त्यासाठी माझा पाठपुरावा सुरु आहे’.
माजी नगरसेविका अरुणा भालेकर म्हणाल्या, ‘स्पाइन रस्त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक बाधित झाले होते. त्यांना योग्यप्रमाणात मोबदला मिळण्यासाठी गेल्या पंचवार्षिकमध्ये पाठपुरावा केला. आमदार महेश लांडगे यांच्याकडे देखील आमचा पाठपुरावा सुरु होता. त्याला अखेर यश आले असून काही बाधित नागरिकांना आज प्लॉटचे वाटप करण्यात आले आहे’.
पालिकेचे भुमी व जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त मंगेश चितळे म्हणाले, ‘स्पाइन रत्यापैकी पहिल्या टप्प्यातील 50 मीटर ते 60 मीटर रस्त्याने बाधित झालेल्या नागरिकांना भूखंडाचे वाटप करण्यात आले. त्यासाठी प्राधिकरणाकडून मंजूर झालेल्या पेठ क्रमांक 11 मध्ये 1250 स्वेकर फुटाने 78 बाधितांना जागेचे वाटप करण्यात आले’.